भुगोल विभाग प्रमुख डॉ. अमित धोर्डे (फोटो- सोशल मीडिया)
भूगोल हा विषय केवळ कला शाखेपुरता मर्यादित नाही
भूगोल विषयातून विद्यार्थ्यांना तसेच संशोधकांना अनेक संधी उपल
गंभीर आव्हानांचा देखील करावा लागतोय सामना
सोनाजी गाढवे /पुणे: भूगोल हा विषय केवळ कला शाखेपुरता मर्यादित नसून तो सर्व विज्ञान शाखांची जननी आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. अमित धोर्डे यांनी केले. ‘नवराष्ट्र’शी संवाद साधताना त्यांनी भूगोल विषयाचे बहुआयामी स्वरूप, त्यातून उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक आणि व्यावसायिक संधी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाशी असलेले त्याचे नाते यावर सविस्तर प्रकाश टाकला. आणि तंत्रज्ञान, हवामान बदल, आपत्ती व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रांत भूगोलाची भूमिका अधिक महत्त्वाची होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भूगोल हा केवळ नकाशे, पर्वत, नद्या किंवा हवामान यापुरता मर्यादित विषय नसून तो मानवी समाज, आर्थिक घडामोडी, पर्यावरणीय बदल आणि तंत्रज्ञानाशी घट्टपणे जोडलेला शास्त्रशाखा आहे. आजच्या बदलत्या जागतिक परिस्थितीत भूगोल विषयातून विद्यार्थ्यांना तसेच संशोधकांना अनेक संधी उपलब्ध होत आहेत, मात्र त्याचबरोबर काही गंभीर आव्हानांनाही सामोरे जावे लागत आहे.
पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांचा वाढदिवस; जाणून घ्या 13 जानेवारीचा इतिहास
भूगोल विषयातील संधींचा विचार केला तर सर्वप्रथम पर्यावरण आणि हवामान बदल अभ्यासाचे क्षेत्र महत्त्वाचे ठरते. जागतिक तापमानवाढ, अतिवृष्टी, दुष्काळ, समुद्रपातळी वाढ यांसारख्या समस्यांचा अभ्यास भूगोलशास्त्राच्या मदतीने केला जातो. पर्यावरण सल्लागार, हवामान अभ्यासक, शाश्वत विकास तज्ज्ञ अशा विविध क्षेत्रांत भूगोल पदवीधारकांसाठी रोजगाराच्या संधी वाढत आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापन हेही भूगोलाशी निगडित महत्त्वाचे क्षेत्र असून पूर, भूकंप, चक्रीवादळ यांसारख्या आपत्तींचे पूर्वानुमान, नियोजन आणि पुनर्वसनासाठी भूगोलाचे ज्ञान अत्यावश्यक ठरते.
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे नवे आयाम आणि संधी
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भूगोल विषयाला नवे आयाम मिळाले आहेत. भौगोलिक माहिती प्रणाली (जिआयएस), रिमोट सेन्सिंग, ड्रोन तंत्रज्ञान आणि उपग्रह प्रतिमांच्या साहाय्याने शहर नियोजन, वाहतूक व्यवस्थापन, शेती, वनव्यवस्थापन आणि संरक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया यांसारख्या उपक्रमांमध्ये भूगोल तज्ज्ञांची मागणी वाढत आहे. पर्यटन नियोजन, ग्रामीण विकास, जलसंधारण आणि कृषी नियोजन या क्षेत्रांतही भूगोल विषयातील अभ्यासकांना मोठी संधी उपलब्ध आहे. असे डॉ.धोर्डे सांगीतले.
संशोधन आणि सुविधांचा अभाव
भूगोल विषयाला अजूनही अनेक ठिकाणी केवळ सैद्धांतिक विषय म्हणून पाहिले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत अभ्यासक्रम, प्रयोगशाळा सुविधा आणि प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता ही मोठी अडचण आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना जिआयएस किंवा रिमोट सेन्सिंगसारख्या प्रगत साधनांचा प्रत्यक्ष अनुभव मिळत नाही. तसेच संशोधनासाठी आवश्यक निधी, माहिती आणि अद्ययावत साधनांची कमतरताही जाणवते. हवामान बदल, पर्यावरणीय ऱ्हास आणि वाढती लोकसंख्या यामुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्यांना सामोरे जाणे हे भूगोलशास्त्रासमोरील मोठे आव्हान आहे. असे डॉ. धोर्डे सांगीतले.
दक्षिण-मध्य अमेरिकेला लॅटिन अमेरिका का म्हणतात? नेपोलियनने रचला होता ‘तो’ डाव, जाणून घ्या इतिहास
शाळा आणि महाविद्यालया मध्ये पर्यावरण, समाज आणि प्रादेशिक विकास समजून घेण्यासाठी भूगोलाचे महत्त्व अधोरेखित करण्याकरिता व्याख्याने, नकाशा प्रदर्शने, क्षेत्रीय कार्य उपक्रम आणि चर्चासत्रांचे आयोजन करुण साजरा करावा. विद्यार्थांनी भुगोला मधील संधी आणि अव्हाने बघून अभ्यास करावा त्यानंतरच तो यशस्वी होईल.
-डॉ. अमित धोर्डे,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे भुगोल विभाग प्रमुख






