World Hunger Day : जागतिक भूक दिन का साजरा केला जातो? त्याचे महत्त्व, थीम आणि इतिहास जाणून घ्या ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
World Hunger Day 2025 ; जगभरातील उपासमार, कुपोषण आणि अन्न असुरक्षिततेविरुद्ध जनजागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ मे रोजी ‘जागतिक भूक दिन’ (World Hunger Day) साजरा केला जातो. २०११ पासून साजरा होणाऱ्या या दिवसाची सुरुवात ‘द हंगर प्रोजेक्ट’ या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेने केली होती. यामागील उद्दिष्ट एकच उपासमाराने ग्रस्त लाखो लोकांसाठी शाश्वत, सुसंवादी आणि दीर्घकालीन उपाययोजना शोधणे.
या वर्षी जागतिक भूक दिनाची थीम “शाश्वत अन्न व्यवस्थांना प्रोत्साहन देणे“ अशी निश्चित करण्यात आली आहे. ही थीम जागतिक स्तरावर सर्वांसाठी अन्नाची कायमस्वरूपी उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे. या माध्यमातून, पर्यावरणपूरक शेती, अन्न साखळीतील अपव्यय कमी करणे आणि स्थानिक अन्नउत्पादनास प्रोत्साहन देणे यासारख्या उपाययोजनांवर भर दिला जातो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारतविरोधात विनाशकारी कटकारस्थान! चीनच्या मदतीने पाकिस्तान बनवत आहे WMD शस्त्रे; अमेरिकेचा गंभीर इशारा
जगभरात आजही ८० कोटीहून अधिक लोकांना दररोज पुरेसे अन्न मिळत नाही. यातील सुमारे ६० टक्के महिला असून, ९८ टक्के उपासमारग्रस्त लोक हे मध्यम व निम्न उत्पन्न गटांतील देशांमध्ये राहतात. ‘द हंगर प्रोजेक्ट’ च्या माहितीनुसार, एड्स, मलेरिया आणि क्षयरोग या आजारांपेक्षा दरवर्षी जास्त मृत्यू उपासमारीमुळे होतात. भारतीय संदर्भात पाहता, संविधानाच्या कलम ४७ नुसार शासनावर नागरिकांचे पोषण सुनिश्चित करण्याची जबाबदारी आहे. याच पार्श्वभूमीवर, भारत सरकार ‘शून्य भूक’ या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करत आहे.
‘द हंगर प्रोजेक्ट’ या संस्थेने १९७७ साली उपासमार आणि दारिद्र्य निर्मूलनाच्या उद्देशाने कार्य सुरू केले. २०११ पासून जागतिक भूक दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा होऊ लागला.
या दिवसाचे तीन प्रमुख उद्दिष्ट आहेत:
1. उपासमार आणि कुपोषणासंदर्भात जनजागृती करणे.
2. दीर्घकालीन, शाश्वत उपायांद्वारे भूकमुक्त जग घडवणे.
3. सामूहिक कृतीची गरज अधोरेखित करणे.
हा दिवस केवळ भुकेबद्दल बोलण्यासाठी नाही, तर ती संपूर्णपणे नष्ट करण्याच्या कृतीसाठी आहे. तो गरिबी, सामाजिक विषमता, अन्नाच्या असमान वितरण आणि पर्यावरणीय ऱ्हास यांसारख्या समस्यांच्या मुळाशी जाऊन उपाय शोधण्याची प्रेरणा देतो. जागतिक भूक दिन हा जागतिक नागरिकत्वाची भावना जागृत करणारा दिवस आहे, ज्या दिवशी आपण गरिबांच्या हक्कासाठी, पोषणाच्या समानतेसाठी आणि अन्न सुरक्षेसाठी एकत्र उभे राहतो.
२०२४ – “Ending Hunger Together”
२०२३ – “Empowering Communities for Sustainable Nutrition”
२०२२ – “Youth Against Hunger”
२०२१ – “Grow, Nourish, Sustain Together”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा आला जगासमोर! ‘हा’ बहुचर्चितब फोटो निघाला चीनच्या रॉकेट फोर्सचाच अन् नाव भारताचं
२८ मे रोजी साजरा होणारा जागतिक भूक दिन हा एक सामाजिक, मानवी आणि पर्यावरणीय आव्हानाचा वेध घेणारा दिन आहे. “शाश्वत अन्न व्यवस्थांना प्रोत्साहन देणे” ही २०२५ ची थीम या लढ्याला एक नवी दिशा देते. उपासमारमुक्त जगासाठी शासन, स्वयंसेवी संस्था, शेतकरी, आणि नागरिक यांनी एकत्र येऊन निर्णायक पावले उचलण्याची आज गरज आहे. भूक ही केवळ पोटाची नाही, तर संधींच्या अभावाची आणि मानवी हक्कांचीही भूक आहे – याची जाणीव ठेवून आपण सर्वांनी या लढ्यात सहभागी व्हावे, हीच आजच्या दिवसाची खरी शिकवण.