अभिषेक शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
ICC T20 Rankings : आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या आयसीसी रँकिंगमध्ये भारताच्या स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माने नंबर-१ रँकिंग मिळवून इतिहास रचला आहे. तो भारताकडून खेळताना नंबर-१ रँकिंग गाठणारा तिसराच खेळाडू ठरला आहे. अभिषेक शर्माने ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला मागे सारत पहिले स्थान प्राप्त केले आहे.
बुधवार, ३० जुलै रोजी आयसीसी ने टी२० रँकिंग जाहीर केली. यामध्ये मोठा बदल दिसून आला. ट्रॅव्हिस हेडला मागे टाकत अभिषेक शर्मा पहिल्याने क्रमांक काबीज केला आहे. त्याच वेळी, भारताचा तिलक वर्मा या यादीत तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. या यादीमध्ये सूर्यकुमार यादवचा समावेश टॉप-१० मध्ये आहे. सूर्यकुमार यादव तो टी२० रँकिंगमध्ये सहाव्या क्रमांकावर विराजमान आहे.
मागील वर्षी त्याने अभिषेक शर्माने झिम्बाब्वेविरुद्ध टी-२० मध्ये शानदार शतक ठोकले होते. त्याच्या या खेळीने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. परंतु अलिकडेच, अभिषेक शर्माला दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत केलेल्या शानदार कामगिरीचा रँकिंगमध्ये खूप मोठी मदत झाली आहे. गेल्या वर्षी आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकादरम्यान सूर्यकुमारला मागे टाकून ट्रॅव्हिस हेडने पहिला नंबर पटकावला होता. तेव्हापासून तो नंबर-१ वरच कायम होता. वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या टी-२० मालिकेतून बाहेर राहण्याच्या त्याच्या निर्णयामुळे त्याचे मोठे नुकसान झाले. आता त्याची घसरण होऊन तो रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
हेडच्या आधी सूर्यकुमार यादव अव्वल स्थानी विराजमान होता. भारतीय खेळाडूंमध्ये, विराट कोहलीने सर्वाधिक दिवस नंबर-१ रँकिंग आपल्याकडे राखले होते. टी-२० क्रिकेटमध्ये हे प्रतिष्ठित स्थान मिळवणारा कोहली पहिलाच भारतीय पुरुष खेळाडू बनला होता, जेव्हा त्याने २०१४ ते २०१७ दरम्यान बहुतेक वेळा नंबर १ स्थान कायम राखण्यात यश मिळवले होते.
तसेच वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अलिकडच्या मालिकेत ऑस्ट्रेलियन खेळाडूंना रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने ही मालिका ५-० अशी खिशात टाकली. ऑस्ट्रेलियन खेळाडू जोश इंगलिस ६ स्थानांचा फायदा झाला. आता तो ९ व्या स्थानावर पोहोचला आहे. पाच सामन्यांमध्ये २०५ धावा काढून ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ ठरलेल्या टिम डेव्हिडला १२ स्थानांचा फायदा होऊन तो २८ व्या स्थानावर पोहोचला आहे, तर कॅमेरॉन ग्रीन ६४ स्थानांनी वर चढून २४ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.
हेही वाचा : IND vs ENG : ओव्हल कसोटीत ‘हा’ स्टार प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवा.., माजी भारतीय फलंदाज पार्थिव पटेलचे मत
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज नाथन एलिस सात स्थानांचा फायदा होऊन आठव्या स्थानावर तर शॉन अॅबॉट २१ स्थानांनी वर जाऊन २३ व्या स्थानावर पोहचला आहे. तर किवी वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीला १० स्थानांचा फायदा झाला असून तो १९ व्या स्थानावर पोहचला आहे.