सुनील गावस्कर(फोटो-सोशल मिडिया)
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे चौथा कसोटी सामना खेळवला जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस सुरु आहे. भारताच्या ३५८ धावांच्या प्रतिउत्तरात इंग्लंडने दमदार कामगिरी करत ४ विकेट्स गमावून ४०९ धावा करून ५१ धावांची आघाडी घेतली आहे, जो रूट १०५ तर बेन स्टोक्स २८ धावांवर खेळत आहे. तत्पूर्वी पहिल्या दिवशी ऋषभ पंतला फलंदाजी दरम्यान दुखापत झाली होती, त्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. यामधून एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला होता. तो म्हणजे क्रिकेटमध्ये लाईक-टू-लाईक रिप्लेसमेंट कुठून आले. यावर, सुनील गावस्कर यांनी चौथ्या कसोटीचे समालोचन करताना सध्याच्या कन्कशन नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गावस्कर म्हणाले की, रिप्लेसमेंट कन्कशन नियम हा त्या ‘अक्षम’ फलंदाजांसाठी आहे जे शॉर्ट-पिच बॉलिंग खेळण्यास असक्षम आहे.
गावस्कर यांनी सोनी स्पोर्ट्सवर सध्याच्या कन्कशन नियमावर प्रश्न उपस्थित केले आहे. ते म्हणले, ‘मी नेहमीच असे मानत आलो आहे की, तुम्ही ‘अक्षम’ फलंदाजाला लाईक-टू-लाईक सब्सिटिटिव्ह देत आहात. जर तुम्ही शॉर्ट-पिच बॉलिंग खेळण्यास अक्षम असाल तर तुम्ही कसोटी क्रिकेट खेळू नये. टेनिस किंवा गोल्फ खेळणे त्यापेक्षा अधिक चांगले. या नियमानुसार, जर तुम्ही त्या फलंदाजाला सारखे पर्याय देण्याचा प्रयत्न करत असाल, तर तो शॉर्ट-पिच बॉल खेळू शकत नाही आणि त्याला दुखापत होते.’
सुनील गावस्कर म्हणाले की, ‘पंत स्पष्टपणे जखमी असून अशा परिस्थितीत, त्याच्या जागी एक पर्यायी खेळाडू असायला हवा. माझी अशी इच्छा आहे की, या विषयावर निर्णय घेणारी एक समिती असायला हवी. आयसीसीमध्ये एक क्रिकेट समिती असून तिचे नेतृत्व सौरव गांगुली करत आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह असून सीईओ संजोग गुप्ता आहेत.’ गावस्करांनी असा विश्वास व्यक्त केला आहे की, आता सर्व महत्त्वाची पदे भारतीयांनी व्यापली आहेत, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक वेगळी समिती असायला हवी.
गावस्कर पुढे म्हणाले, “आम्हाला येथील (इंग्लंड) मीडियामध्ये आणि विशेषतः ऑस्ट्रेलियन मीडियामध्ये अशी परिस्थिती नको आहे की ते म्हणतात, ‘अरे आता येथे प्रत्येकजण भारतीय आहे, त्यांनी हे करायला सुरुवात केली आहे.” अशा परिस्थितीत, दुखापतींच्या प्रकरणांकडे पाहणारी एक पूर्णपणे वेगळी समिती असायला हवी.