भारताचे पाकिस्तानसमोर 253 धावांचे लक्ष्य(फोटो-सोशल मीडिया)
IND vs PAK, Under-19 World Cup Live : २०२६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेमध्ये आज क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावेयो येथे भारत १९ वर्षांखालील संघ आणि पाकिस्तान १९ वर्षांखालील संघ यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात टॉस गमाणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत वेदांत त्रिपाठीच्या अर्धशतकाच्या जोरावर ४९.५ षटकात सर्वबाद २५२ धावा केल्या आहेत. पाकिस्तान संघाला हा सामना आपल्या खिशात टाकायचा असेल तर २५३ धावा कराव्या लागणार आहेत. या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांना चांगलेच बांधून ठेवले. पाकिस्तानकडून अब्दुल सुभानने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावेयो येथे भारत १९ वर्षांखालील संघ आणि पाकिस्तान १९ वर्षांखालील संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय संघघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. भारताकडून आरोन जॉर्ज आणि वैभव सूर्यवंशी या सलामी जोडीने डावाची सुरुवात केले. या दोघांनी ७.४ षटकापर्यंत ४७ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर मात्र भारताची घसरगुंडी उडाली. भारताचे८.१ षटकातच ४७ धावांवरच महत्वाचे ३ फलंदाज माघारी गेले. आरोन जॉर्ज १६ धावा करून बाद झाला. त्याला अब्दुल सुभानने बाद केले, त्यानंतर मैदानात आलेला भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे भोपळा न फोडताच माघारी गेला. या दोघांचा त्याला मोहम्मद सय्यमने आपली शिकार बनवले. एका टोकाला डाव सांभाळत असलेला वैभव सूर्यवंशी मोठी खेळी करेल असे वाटत असताना मात्र २२ चेंडूत ३० धावा करत बाद झाला, त्याल देखील मोहम्मद सय्यमने बाद केले.
त्यानंतर वेदांत त्रिपाठी आणि विहान मल्होत्रा यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी ६२ धावांची भागीदारी केली.परंतु, विहान मल्होत्रा ४३ चेंडूत २१ धावा करून बाद झाला. त्याला अहमद हुसेनने माघारी पाठवले. समोच्या टोकावरू विकेट जात असताना वेदांत त्रिपाठी मात्र टिकून खेळत होता. भरवशाचा फलंदाज अभिज्ञान कुंडू देखील या सामन्यात आपली छाप पडू शकला नाही, त्याला अली हसन बलोचने १६ धावांवर बाद केले. दरम्यान वेदांत त्रिपाठीने आपले अर्धशतक झळकवले. त्यानंतर तो बाद झाला. त्रिपाठीने ९८ चेंडूत ६८ धावा केल्या. या खेळीत त्याने २ चौकार आणि १ षटकार ठोकला. त्याला मोमीन कमरने बाद केले.
त्रिपाठी माघारी गेल्यावर, आरएस अंबरिश आणि कनिष्क चौहान यांनी डाव सावरला. दरम्यान, अंबरिश २९ धावा करून बाद झाला. त्याला अली रझाने आपली शिकार बनवले. अंबरिश गेल्यावर कनिष्क चौहान आणि खिलन पटेल यांनी संयमी खेळ खेळत भारताचा डाव सावरला. कनिष्क चौहान २९ चेंडूत ३५ धावा करून बाद झाला. त्यानंतर खिलन पटलेही २१ धावा करून बाद झाला. तसेच दीपेश देवेंद्रन १ धाव काढून बाद झाला तर हेनील पटेल १ धाव कडून नाबाद राहिला. भारत ४९.५ षटकात २५२ धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून अब्दुल सुभानने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या आणि मोहम्मद सय्यमने २ विकेट्स काढल्या. तसेच अली हसन बलोच, अली रझा, मोमीन कमर आणि अहमद हुसैन यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवली.
पाकिस्तान U19 प्लेइंग इलेव्हन: हमजा जहूर (w), समीर मिन्हास, उस्मान खान, अहमद हुसैन, फरहान युसफ (c), हुजैफा अहसान, अली हसन बलोच, अब्दुल सुभान, मोमीन कमर, मोहम्मद सय्यम, अली रझा
भारत अंडर 19 प्लेइंग इलेव्हन: आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (क), विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (डब्ल्यू), वेदांत त्रिवेदी, आरएस अंबरिश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन






