रोहित शर्मा आणि विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेत भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली इंग्लंडसोबत दोन हात करत आहेत. आतापर्यंत मालिकेतील तीन सामने खेळण्यात आले आहेत. या मालिकेत इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत युवा संघ चांगली कामगिरी करत असले तरी चाहत्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहलीची आठवण यायला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी इंग्लंड मालिकेपूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.
टीम इंडियाच्या या दोन दिग्गज खेळाडूंच्या या निवृत्तीच्या निर्णयानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. सर्वांना हाच प्रश्न छळत होता की, इंग्लंडसोबतच्या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी दोघांनीही इतका मोठा निर्णय का घेतला असावा? यामागे बोर्डाचा दबाव असण्याची शक्यता असेल का? अशी देखील शंका निर्माण झाली होती.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विराट आणि रोहित या खेळाडूंना जास्त धावा करता आल्या नाहीत. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या दोघांच्या निवृत्तीबद्दल मोठे विधान केले असून मंडळाची भूमिका मांडली आहे.
हेही वाचा : IND VS ENG : WTC points table मध्ये भारताला मोठा झटका! इंग्लंड संघाची दुसऱ्या स्थानावर मुसंडी
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले आहेत की, कोणत्याही खेळाडूच्या निवृत्तीचा निर्णय हा त्याचा स्वतःचा असतो. कोणतीही क्रिकेट संघटना त्याला निर्णय घेण्यास भाग पाडू शकत नाही.
एएनआयशी बोलताना ते म्हणाले की, “मी पुन्हा एकदा हे स्पष्ट करतो की, आपल्या सर्वांना रोहित शर्मा आणि विराट कोहलीची आठवण येत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी स्वतःहून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे धोरण आहे की आम्ही कोणत्याही खेळाडूला निवृत्ती घेण्यास सांगत नाही. हा त्या दोघांचा स्वतःचा निर्णय होता.”
राजीव शुक्ला पुढे म्हणाले की, “त्यांनी स्वतःच्या मर्जीने सान्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्यांना नेहमीच लक्षात ठेवू. आम्ही त्यांना एक महान फलंदाज म्हणून ओळखत आहोत. हे दोघेही एकदिवसीय सामन्यांसाठी उपलब्ध आहेत ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.”
हेही वाचा : IND VS ENG : लॉर्ड्स कसोटी विजयानंतर इंग्लंड संघात नव्या खेळाडूची एन्ट्री; ‘या’ स्टारची घेणार जागा..
रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गज खेळाडूंनी इंस्टाग्राम पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली होती. हे दोन्ही खेळाडू आयपीएलपूर्वी रणजी ट्रॉफीमध्ये खेळले होते. अशा परिस्थितीत असे वाटत होते की ही इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेची ते तयारी करत होते. पण अचानक दोघांनीही कसोटी क्रिकेटला राम राम ठोकला होता. अशा परिस्थितीत, आता बोर्ड आणि दोन दिग्गज खेळाडूंमधील मतभेदाबद्दल सर्वांच्या मनात काही शंका होत्या, त्या बीसीसीआयच्या उपाध्यक्षांनी संपुष्टात आणल्या आहेत.