पृथ्वी शॉचे शतक आणि त्यानंतर मुशीर खानसोबत भांडण (Photo Credit- X)
Prithvi Shaw Fight Video: पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) पुन्हा एकदा आपल्या बॅटने चर्चेत आला आहे. रणजी ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रासाठी सराव सामना खेळत असलेल्या शॉने आपल्या माजी रणजी टीम मुंबईविरुद्ध तुफानी शतक झळकावले. पण शतक पूर्ण करून तो बाद होताच, मैदानात जबरदस्त वाद निर्माण झाला आणि हे खेळाडू आपल्या जुन्या सहकाऱ्यांशीच भिडले.
एमसीएच्या मैदानावर हा सराव सामना खेळला जात आहे. ज्या मुंबई संघाला पृथ्वी शॉने याच वर्षी सोडले, त्याच संघाच्या गोलंदाजांची त्याने जोरदार धुलाई केली. शॉने २१९ चेंडूंमध्ये १८१ धावांची शानदार खेळी केली. या शतकाच्या मदतीने महाराष्ट्र संघाने ४३० धावांचा डोंगर उभा केला. त्याने ८४ चेंडूंमध्ये अर्धशतक तर १४४ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. या खेळाडूने अष्टपैलू अर्शीन कुलकर्णीसोबत पहिल्या विकेटसाठी३०५ धावांची मोठी भागीदारी रचली. पृथ्वी शॉने आपल्या बॅटिंगने स्पष्ट केले आहे की तो या रणजी हंगामात महाराष्ट्रासाठी मोठे योगदान देण्यासाठी सज्ज आहे.
Heated exchange between Prithvi Shaw and Mumbai players after his wicket! pic.twitter.com/l9vi1YgeYs — INSANE (@1120_insane) October 7, 2025
पृथ्वी शॉ ७३.२ ओव्हर्सपर्यंत क्रीजवर होता. पण त्याला मुशीर खानने बाद करताच मैदानात मोठा गोंधळ निर्माण झाला. पृथ्वी शॉ बाद होताच मुंबईच्या खेळाडूंनी त्याला घेरले. स्लेजिंग ऐकताच पृथ्वी शॉने आपला संयम गमावला आणि तो मुंबईच्या खेळाडूंवर ओरडू लागला. मैदानात वाद वाढत चालल्याने अखेरीस पंचांना मध्यस्थी करावी लागली आणि हा हाय-व्होल्टेज ड्रामा शांत करावा लागला. नंतर, पृथ्वी शॉ ड्रेसिंग रूममध्ये परतत असताना, सिद्धेश लाडशी त्याचा वाद झाला. पंचांना हस्तक्षेप करावा लागला. शॉच्या शतकी खेळीनंतरही झालेले हे भांडण आणि वादंग आता चर्चेचा विषय बनले आहे.
शॉचा वादाचा मोठा इतिहास आहे. काही वर्षांपूर्वी तो एका युट्यूबरसोबत वादात अडकला होता. या वादाचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये शॉ रस्त्याच्या मधोमध हाणामारी करताना दिसत होता. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध पोलिस तक्रारही दाखल करण्यात आली होती. शॉ बऱ्याच काळापासून टीम इंडियाबाहेर आहे आणि स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून तो भारतीय संघात परतू इच्छितो. आयपीएल २०२५ पूर्वी झालेल्या मेगा लिलावात तो विकला गेला नाही.