Rishabh Pant : कार दुर्घटनेतून परतलेल्या ऋषभ पंतला खास पुरस्कारासाठी नामांकन(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Rishabh Pant : भारतीय संघ सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद पाकिस्तानकडे असल्यामुळे भारताने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारताचे सर्व सामने दुबईत आयोजित करण्यात आले आहेत. भारतीय संघाने साखळी फेरीत सलग तीन सामने जिंकून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारत ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. या संघात ऋषभ पंतचाही समावेश आहे. त्याला एका खास पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचा डिसेंबर 2022 मध्ये भीषण कार अपघात झाला होता. त्यांतर ऋषभ पंतने भारतीय संघात जोरदार पुनरागमन केले होते. त्यानंतर ऋषभ पंतने मागे वळून पहिलेच नाही. त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. अशातच पंतला आता ‘कमबॅक प्लेअर ऑफ द इयर’ म्हणून नामांकन मिळाले आहे. ऋषभ पंतला ‘कमबॅक ऑफ द इयर’ साठी लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स 2025 साठी नामांकन मिळाले आहे. हा पुरस्कार सोहळा माद्रिद येथे २१ एप्रिल रोजी पार पडणार आहे.
ऋषभ पंतचा 30 डिसेंबर 2022 रोजी दिल्लीहून त्याच्या मूळ गावी रुरकीला जात असताना भीषण कार अपघात झाला होता. डेहराडूनमधील रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर, 27 वर्षीय ऋषभला मुंबईला हलवण्यात आले होते. जिथे बीसीसीआयच्या तज्ञ सल्लागाराच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. ऋषभ पंतच्या उजव्या गुडघ्याच्या तीनही अस्थिबंधांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. नंतर पंतने बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आपले पुनर्वसन पूर्ण केले.
हेही वाचा : IPL 2025 : अखेर KKR ला नवीन कर्णधार मिळाला; ‘या’ मराठमोळ्या खेळाडूकडे सोपविली संघाची धुरा..
जीवघेण्या दुखापतीतून सावरल्यानंतर ऋषभ पंतने मागील वर्षी मुल्लांपूर येथे पंजाब किंग्ज विरुद्ध त्याच्या तत्कालीन आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्ससाठी मैदानात उतरले होते. त्यानंतर पंतने आपल्या खेळाच्या बळावर कसोटी क्रिकेटमध्ये विजयी पुनरागमन करून कार अपघातानंतर बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दमदार शतक झळकावले होते. त्याच्या या कामगिरीमुळे त्या सामन्यात भारताला 280 धावांनी विजय मिळवता आला होता.
ऋषभ पंतने आजवर 43 कसोटी सामन्यात 2948 धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पंतने 31 सामने खेळले असून 27 डावांमध्ये त्याने 871 धावा केल्या आहेत. तर आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याने 76 सामन्यात 1209 धावा केल्या आहेत. त्याच्या आयपीएल करियरबद्दल सांगायच झालं तर त्याने आयपीएलमध्ये 111 सामन्यांमध्ये 3284 धावा केल्या आहेत.