India Beat Malaysia: पुरुष हॉकी आशिया कप २०२५ मध्ये भारतीय संघाने आपला दबदबा कायम ठेवला आहे. ग्रुप स्टेजमधील तिन्ही सामने जिंकल्यानंतर, सुपर-४ राउंडमध्येही भारताने आपला पहिला विजय नोंदवला. या फेरीतील पहिल्या सामन्यात कोरियाविरुद्ध २-२ असा ड्रॉ खेळल्यानंतर, भारतीय हॉकी संघाने दुसऱ्या सामन्यात मलेशियाचा ४-१ ने पराभव करत अंतिम सामन्यातील आपल्या आशा जिवंत ठेवल्या. हा विजय दमदार असला तरी, त्यासाठी संघाला सुरुवातीला संघर्ष करावा लागला, कारण पहिल्याच मिनिटात मलेशियाने गोल करून भारतीय कॅम्पला धक्का दिला होता.
बिहारच्या राजगीरमध्ये सुरू असलेल्या आशिया कप २०२५ च्या सुपर-४ राउंडमध्ये गुरुवारी, ४ सप्टेंबर रोजी टीम इंडियाची लढत मलेशियाशी झाली. भारताने याआधीच्या सामन्यात कोरियाविरुद्ध ड्रॉ खेळला होता, जिथे त्यांनी १-२ अशा पिछाडीनंतर पुनरागमन केले होते. विशेष म्हणजे याच कोरिया संघाला मलेशियाने पूल स्टेजमध्ये ४-१ ने हरवले होते. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि तो टीम इंडियासाठी एक मोठे आव्हान मानले जात होता.
ALL THE ACTION, ALL THE GOALS! 🔥
Catch the highlights of India’s 4–1 victory over Malaysia in the Super 4s of the Hero Asia Cup Rajgir, Bihar 2025.#HockeyIndia #IndiaKaGame #HumseHaiHockey #HeroAsiaCupRajgir pic.twitter.com/wGtg5nMNa9
— Hockey India (@TheHockeyIndia) September 4, 2025
सामन्याच्या सुरुवातीलाच टीम इंडियाला या आव्हानाची जाणीव झाली. अवघ्या ५० सेकंदांमध्येच मलेशियाने पहिला गोल डागून स्टेडियममधील सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर, टीम इंडियाने सातत्याने हल्ला सुरू ठेवला आणि बरोबरी साधण्यासाठी प्रयत्न करत राहिली, पण त्यांना यशासाठी थोडी वाट पाहावी लागली. अखेरीस, १७ व्या मिनिटात मनप्रीत सिंगने पहिला गोल करत संघाला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली.
या गोलनंतर भारतीय संघ पूर्णपणे सामन्यावर हावी झाला आणि पुढील ७ मिनिटांत स्कोअर ३-१ झाला. १९ व्या मिनिटात सुखजीत सिंगने आणि २४ व्या मिनिटात शिलानंद लाकडाने गोल करत मलेशियाच्या विजयाच्या आशांना धक्का दिला. दुसऱ्या हाफमध्ये ३८ व्या मिनिटात अनुभवी खेळाडू विवेक सागर प्रसादने संघाचा चौथा गोल करून राहिलेली कसर पूर्ण केली. यानंतर भारतीय संघाने आणखी गोल केले नाहीत, पण मलेशियालाही एकही गोल करू दिला नाही.