हॅमिल्टन : नेदरलँड क्रिकेट संघ एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी न्यूझीलंड (NZ vs NED) दौऱ्यावर आहे. एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना हॅमिल्टन येथे खेळला गेला. न्यूझीलंडने हा सामना ११८ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. मालिकेतील पहिल्या सामन्यात किवींनी ७ विकेट्सने विजय मिळवला होता. यासह त्यांनी मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात किवी कर्णधार टॉम लॅथमने १४० धावांची नाबाद खेळी खेळली. एका क्षणी न्यूझीलंडने ३२ धावांवर ५ विकेट गमावल्या होत्या, परंतु लॅथमने संघाला अडचणीत आणले. १२३ चेंडूंच्या नाबाद खेळीत न्यूझीलंडच्या कर्णधाराने १० चौकार आणि ५ षटकार ठोकले. त्याने ब्रेसवेलसोबत ७व्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली.
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २६४ धावा केल्या. नेदरलँडचा संघ अवघ्या १४६ धावांवर बाद झाला. गोलंदाजीत किवीजकडून मिचेल ब्रेसवेलने तीन तर काईल जेम्सन आणि ईश सोधीने प्रत्येकी दोन बळी घेतले. आज टॉम लॅथमचाही वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारा तो फलंदाज बनला आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने सचिन तेंडुलकरचा २४ वर्षे जुना विक्रम मोडला.
सचिनने २४ एप्रिल १९९८ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोका-कोला कपच्या अंतिम सामन्यात १३१ चेंडूत १३४ धावा केल्या होत्या. सचिनच्या या खेळीच्या जोरावर भारताने २७३ धावांचे लक्ष्य गाठून सामना जिंकला. या यादीत न्यूझीलंडचा रॉस टेलर तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०११ च्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध टेलरने वाढदिवसाच्या दिवशी १३१ धावांची नाबाद खेळी खेळली होती. या यादीत आणखी एक भारतीय खेळाडू विनोद कांबळीचेही नाव आहे. १९९३ मध्ये कांबळीने त्याच्या वाढदिवशी न्यूझीलंडविरुद्ध १०० धावांची नाबाद इनिंग खेळली होती.