Yuvraj Singh And Shubman Gill (Photo Credit- X)
Yuvraj Singh on Shubman Gill: भारतीय संघाचा युवा कसोटी कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) याने इंग्लंड दौऱ्यात केवळ आपल्या नेतृत्वानेच नव्हे, तर फलंदाजीनेही सर्वांना प्रभावित केले. गिलच्या या कामगिरीने त्याच्यावर टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. गिलच्या यशावर समाधानी असलेल्या माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) याने त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.
शुभमन गिलसाठी कसोटी कर्णधार म्हणून ही पहिलीच मालिका होती. इंग्लंडसारख्या कठीण भूमीवर ५ कसोटी सामन्यांमध्ये त्याने ७५४ धावा केल्या. या धमाकेदार कामगिरीमुळे, ‘भारताबाहेर गिल धावा करू शकत नाही’ असे म्हणणाऱ्या टीकाकारांना त्याने शांत केले आहे. भारताने इंग्लंडविरुद्धची ५ सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली, ज्याचे श्रेय गिलच्या नेतृत्वाला आणि त्याच्या युवा संघाला दिले जात आहे.
आयसीसीशी (ICC) बोलताना युवराज सिंगने शुभमन गिलची प्रशंसा केली. तो म्हणाला, “शुभमन गिलच्या परदेशातील रेकॉर्डवर अनेक प्रश्न होते. पण हा मुलगा कर्णधार झाला आणि त्याने चार शतके ठोकली. गिलची ही कामगिरी खरोखरच अद्भुत आहे. जेव्हा तुम्हाला जबाबदारी दिली जाते, तेव्हा तुम्ही ती कशी स्वीकारता हे सर्वात महत्त्वाचे असते.”
युवराजने गिलच्या युवा ब्रिगेडचेही कौतुक केले. तो म्हणाला, “मला या संघाचा खूप अभिमान आहे. जरी मालिका अनिर्णित राहिली असली तरी, माझ्या मते हा विजयच आहे. कारण हा एक तरुण संघ आहे आणि इंग्लंडमध्ये जाऊन स्वतःला सिद्ध करणे सोपे नसते.”
Yuvraj Singh lauds Team India skipper Shubman Gill after he led them to draw a memorable Test series against England.#ENGvsIND #YuvrajSingh #ShubmanGill #TeamIndia #CricketTwitter pic.twitter.com/BsOYibX8vu
— InsideSport (@InsideSportIND) August 14, 2025
भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका (India vs England Test Series) २-२ अशी बरोबरीत संपली. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा सामना कारावा लागला त्यानंतरएजबॅस्टनमध्ये पुनरागमन करत भारताने गिलच्या नेतृत्वाखालील संघाने शानदार कामगिरी करत इंग्लंडला हरवले. त्यानंतर, इंग्रजांनी लॉर्ड्स कसोटी जिंकली तिथे भारताला वाईट पराभवाला सामोरे जावे लागले. पण, मालिकेतील चौथी कसोटी अनिर्णित राहिली. त्यानंतर, ओव्हलमध्ये भारतीय गोलंदाजांनी, विशेषतः सिराज (Mohammed Siraj) आणि प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) यांच्या घातक गोलंदाजीमुळे भारताने निर्णायक विजय मिळवत मालिका बरोबरीत सोडवली.
आता क्रिकेटप्रेमींना आशिया कप २०२५ स्पर्धेचे वेध लागले आहे. या स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. भारतीय संघ आणि त्यांचे क्रिकेट बोर्ड आशिया कप २०२५ च्या तयारीत मग्न आहे. आशिया कपचे वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आले आहे. त्यात सहभागी होणाऱ्या संघा देखील आपल्या तयारीला लागले आहेत. लवकरत बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा होणार आहे.