डिजिटल अरेस्टसाठी तयार केलं चक्क बनावट कोर्ट! खोट्या कॉलने झाली सुरुवात आणि वृद्धाने गमावले लाखो रुपये
स्कॅमर्स लोकांकडून पैसे उकळण्यासाठी नवीन पद्धती शोधत आहेत. यातीलच एक पद्धत म्हणजे डिजीटल अरेस्ट. आतापर्यंत डिजीटल अरेस्टची अनेक प्रकरण समोर आली आहे. या प्रकरणांमध्ये स्कॅमर्स खोटे पोलीस ऑफीसवर बनवून लोकांना फसवतात, त्यांच्यावर खोटे आरोप करतात आणि पैसे उकळतात. आता समोर आलेल्या प्रकरणामुळे सर्वचजण हादरून जाणार आहेत.
जयपुरच्या मानसरोवर परिसरात डिजीटल अरेस्टची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यावेळी स्कॅमर्सनी वृद्धाला फसवण्यासाठी चक्क बनावट कोर्ट तयार केलं आहे. या घटनेत स्कॅमर्सनी वृद्धावर मनी लॉड्रिंगचा खोटा आरोप लावला आणि तीन दिवसांपर्यंत डिजिटल अरेस्ट ठेवलं. शिवाय मानसिक छळ देखील केला. या संपूर्ण प्रकरणानंतर घाबरून वृद्धाने स्कॅमर्सना तब्बल 23 लाख रुपये दिले. (फोटो सौजन्य – Pinterest)
ही घटना 23 मे रोजी सकाळी 9:44 वाजण्याच्या सुमारास घडली. वृद्ध व्यक्तिला अनोळखी नंबरवरून दोन फोन आले. यातील एका व्यक्तिने दावा केला की तो मुंबईच्या कोलाबा पोलीस ठाण्यातील अधिकारी संजय कुमार आहे. या व्यक्तिने दावा केला की, वृध्द व्यक्तिचा मोबाईल नंबर 2.8 करोड रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणाशी जोडलेला आहे. वृद्ध व्यक्तिच्या नावाने अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्याचेही फोनवरील व्यक्तिने सांगितले.
कथित संजय कुमार नावाच्या फोनवरील व्यक्तिने वृद्ध व्यक्तिचे आणखी एका स्कॅमरसोबत बोलणं करून दिलं. या दुसऱ्या व्यक्तिने सीबीआई अधिकारी रोहित कुमार गुप्ता असल्याचा दावा केला. दोघांनी मिळून त्या वृद्धाला पटवून दिले की त्यांच्या करण्यात आलेले आरोप खरे आहेत. यानंतर दोन्ही स्कॅमर्सनी वृद्ध व्यक्तिला घाबरवण्यासाठी एक व्हिडिओ कॉल केला ज्यामध्ये एक बनावट न्यायालयीन दृश्य दाखवण्यात आले ज्यामध्ये एक न्यायाधीश वृद्ध व्यक्तिचे सर्व बँक खाते गोठवण्याचा आदेश देत होता.
स्कॅमर्सनी वृद्धाकडून पैसे उकळण्यासाठी त्यांना 3 दिवस डिजीटल अरेस्ट केलं, शिवाय मानसिक छळ देखील केला. यानंतर वृद्ध व्यक्तिने स्कॅमर्सच्या म्हणण्यानुसार, वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रांसफर केले. थोडे – थोडे करून तब्बल 23.56 लाख रुपये ट्रांसफर करण्यात आले. जेव्हा वृद्ध व्यक्तिने स्कॅमर्सना सांगितले की त्यांच्याकडे आता पैसे नाहीत, तेव्हा स्कॅमर्सनी त्यांना 20 लाखांची एफडी तोडण्यास सांगितलं.
जेव्हा वृद्ध व्यक्ती एफडी तोडण्यासाठी बँकेत गेली तेव्हा मॅनेजरला काहीतरी गडबड आढळली. संपूर्ण कहाणी ऐकल्यानंतर बँकेने ताबडतोब अधिकाऱ्यांना कळवले. यानंतर, 26 मे रोजी शिप्रापथ पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आणि सायबर गुन्हे शाखेने तपास सुरू केला.