Bitchat: इंटरनेट बंद तरीही मेसेज सुरू! CJP आंदोलनात विद्यार्थ्यांनी वापरले कोणते तंत्रज्ञान? जाणून घ्या
इंटरनेट बंद केल्यानंतर आंदोलक एक-दुसऱ्यांना मेसेज कसे करत होते? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. यासाठी एका विशेष ॲपचा वापर केला असण्याची शक्यता आहे. हे ॲप म्हणजेच बिटचॅट. बिटचॅट हे एक ऑफलाइन मेसेजिंग ॲप आहे. जंतर-मंतर या ठिकाणी उपस्थित असलेले आंदोलक बिटचॅट या मेसेजिंग ॲपचा वापर करत असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य अद्याप जारी करण्यात आले नाही. मात्र बिटचॅटचा वापर करण्यासाठी मोबाईल नेटवर्क किंवा इंटरनेटवर अवलंबून राहावे लागत नाही, यामुळेच आंदोलनकर्ते हे ॲप वापरत असावेत, अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
खरं तर, बिटचॅट हे एक असं मेसेजिंग ॲप आहे, जे इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्कवर अवलंबून नसते. हे ब्लूटूथ लो एनर्जी म्हणजेच BLE च्या मदतीने आजूबाजूला उपलब्ध असलेल्या दुसऱ्या फोनसोबत कनेक्ट होते. अशावेळी जेव्हा अनेक फोन एकमेकांसोबत जोडले जातात, त्यावेळी एक मेश नेटवर्क तयार केले जाते.
अशा परिस्थितीत एखादा यूजर कोणत्याही दुसऱ्या यूजरला कोणता मेसेज पाठवतो, तेव्हा तो मेसेज उपलब्ध असलेल्या दुसऱ्या डिव्हाईसद्वारे पुढे पाठवला जातो आणि अखेर तो त्याच्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचतो. याचा अर्थ असा आहे की, प्रत्येक फोन एका लहान रिले पॉइंट्सप्रमाणे काम करतो. या मेश नेटवर्कचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, जितके जास्त लोक जोडले जातात, तितका जास्त अंतरापर्यंत मेसेज पोहोचवला जाऊ शकतो. यामुळेच इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्क बंद असतानाही हे ॲप मर्यादित अंतरापर्यंत संदेश पाठवण्याची सुविधा देते.
असं सांगितलं जात आहे की, बिटचॅटव्यतिरिक्त अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी अनेक ऑफलाईन मेसेजिंग ॲप्स उपलब्ध आहेत, जे ब्लूटूथ किंवा वायफाय डायरेक्टद्वारे इंटरनेटशिवाय कम्युनिकेशनची सुविधा ऑफर करतात. अशा ॲप्सचा वापर आपत्कालीन परिस्थितीत, नेटवर्क बिघाड झाल्यास किंवा दुर्गम भागांमध्ये केला जाऊ शकतो. तथापी, जंतर-मंतर येथील आंदोलनकर्ते खरंच बिटचॅटचा वापर करत आहे का, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आली नाही. मात्र केवळ असे दावे केले जात आहेत.






