Infosys Hiring News (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Infosys Hiring News: आता आयटी क्षेत्रात नवीन नोकरी शोधणाऱ्यासाठी मोठी खुशखबर समोर आली आहे. इन्फोसिस (Infosys) कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी त्याचबरोबर नोकरीच्या शोधात करत असलेल्या तरुणांसाठी मोठी जाहीरात प्रसिद्ध केली आहे. कंपनीने यंदा कर्माचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्याचबरोबर आता नव्या पदवीधारांसाठी संधी देण्याची तयारी सुरु आहे. त्यामुळे नुकतेच पास झालेल्या किंवा आयटी क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या आनंदाची बातमी मानली जात आहे.
JOB News: इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलिल पारेख यांनी पत्रकार परिषद घेत निर्णयाची माहिती दिली. कंपनीने वेतनवाढ दोन टप्प्यांत लागू करण्याचे नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात बहुतांश कर्मचाऱ्यांच्या पगारात ऑक्टोबर 2026 पासून वाढ होईल. त्यानंतर वरिष्ठ पदांवरील कर्मचाऱ्यांना जानेवारी 2027 पासून सुधारित वेतनाचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना नक्कीच आर्थिक दिलासा मिळेल.
भरतीबाबतही कंपनीने मोठी घोषणा केली आहे. चालू आर्थिक वर्षात तब्बल 20 हजार फ्रेशर्सना नोकरीची संधी दिली जाणार आहे. यापैकी चार हजारांहून अधिक उमेदवारांची नियुक्ती आधीच करण्यात आली आहे. त्यामुळे अभियांत्रिकी आणि संगणक क्षेत्रातील शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
दरम्यान कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या कंपनी सोडणे, नवी लोक येण्याच्या प्रमाणातीही काहीसा बदल दिसत आहे. मागील वर्षभरात अनेक कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडल्यामुळे ॲट्रिशन रेट वाढला आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांची एकूण संख्या मार्चच्या तुलनेत जूनअखेर थोडीशी कमी असल्याचे आकडेवारीतून दिसून आले. मात्र, नवीन भरतीमुळे ही संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
आर्थिक कामगिरीच्या बाबतीतही इन्फोसिसने चांगली प्रगती नोंदवली आहे. जून तिमाहीत कंपनीच्या नफ्यात लक्षणीय वाढ झाली असून महसूलही वाढला आहे. मात्र, जागतिक आर्थिक परिस्थिती आणि आयटी क्षेत्रातील मंदावलेली मागणी लक्षात घेऊन कंपनीने आगामी वर्षासाठी महसूल वाढीचा अंदाज कमी केला आहे. यामुळे पुढील काळात उद्योगासमोर काही आव्हाने कायम राहतील, असे संकेत मिळत आहेत.
कंपनीच्या नेतृत्वातही लवकरच बदल होणार आहेत. विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी सलिल पारेख यांचा कार्यकाळ पुढील वर्षी संपणार असल्याने नव्या नेतृत्वाची तयारी कंपनीने सुरू केली आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत इन्फोसिसच्या व्यवस्थापनात महत्त्वाचे बदल पाहायला मिळू शकतात. शेअर बाजारातही इन्फोसिसच्या समभागावर गुंतवणूकदारांचे लक्ष कायम आहे.
अलीकडील व्यवहारात शेअरमध्ये किरकोळ वाढ झाली असली, तरी वर्षभरात त्यात मोठी घसरण झाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील झपाट्याने होणारी प्रगती आणि जागतिक स्पर्धा यामुळे आयटी कंपन्यांवर दबाव वाढला आहे. अनेक कंपन्या नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बदल करत आहेत.
अशा परिस्थितीत इन्फोसिसने एकीकडे कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला आणि दुसरीकडे हजारो नव्या उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रातील अनिश्चिततेमध्ये हा निर्णय आशादायी मानला जात आहे. विशेषतः नव्याने करिअर सुरू करणाऱ्या तरुणांसाठी ही घोषणा भविष्यातील संधींचे नवे दार उघडणारी ठरू शकते.






