'चोरीला गेलेली कोट्यवधींची संपत्ती परत करा', युनूस यांची हसीना सरकारवर तोफ; कुटुंबाची चौकशी सुरू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ढाका: बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे. शेख हसीना आणि युनूस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु असून युनूस यांनी पुन्हा एकदा हसीना यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मोहम्मद युनूस यांनी शेख हसीना सरकारच्या भ्रष्ट्राचाराच्या निषेध करत चोरीस गेलेल्या मालमत्तेच्या परतफेडीची मागणी केली आहे. यामुळे पुन्हा एकदा बांगलादेश आणि शेख हसीना यांच्यात राजकीय युद्ध सुरु झाले आहे. मोहम्मद युनूस यांनी तीव्र शब्दात टिका करत म्हटले आहे की, “शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशातील कोट्यवधी डॉलरची सार्वजनिक संपत्ती लुटली गेली आहे, ज्यामुळे देशाला आर्थिक अडचणीत जावे लागले आहे.”
हसीना सरकारच्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू
युनूस यांनी सांगितले की, बांगलादेशातून चोरीस गेलेला पैसा आणि संपत्ती हा बांगलादेशच्या जनतेचा आहे आणि तो परत मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय भागीदारांशी सहयोग करत आहे. त्यांनी म्हटले आहे की, हसीना सरकारच्या कारभारामुळे देशाची आर्थिक प्रगती थांबली आहे. सामान्य लोकांना याचा मोठा फटका बसला आहे.सध्या बांगलादेशातील भ्रष्टाचारविरोधी विभाग (ACC) हसीना आणि त्यांच्या कुटुंबाची चौकशी करत आहे.
या चौकशीत हसीनांच्या भाची आणि ब्रिटनच्या माजी खासदार ट्यूलिप सिद्दीक यांचाही समावेश आहे. हसीना सरकारच्या कार्यकाळात रशियाच्या निधीतून बांधल्या जाणाऱ्या एका अणुऊर्जा प्रकल्पाशी संबंधित 5 अब्ज डॉलरच्या गैरव्यवहाराची चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर ढाकाच्या उपनगरातील एका महत्त्वाच्या ठिकाणी अवैध मालमत्ता बळकावण्याच्या आरोपांचीही तपासणी केली जात आहे. यामुळे ट्यूलिप सिद्दीकी यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
ट्यूलिप सिद्दीक यांच्यावरही आरोप
ब्रिटनच्या माजी खासदार ट्यूलिप सिद्दीक यांनी नुकतेच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार केले नसल्याचा दावा केला आहे. ब्रिटिश मीडिया रिपोर्टनुसार, सिद्दीक यांनी लंडनमधील एक फ्लॅट हसीना सरकारशी संबंधित वकिलाकडून गिफ्ट स्वरूपात घेतला होता.
तसेच, हसीनांच्या पक्षाशी संबंधित सदस्यांनी खरेदी केलेल्या लंडनमधील इतर संपत्त्यांचाही त्यांच्या कुटुंबाने वापर केला असल्याचा आरोप आहे. सिद्दीकी यांच्या राजीनाम्याने ब्रिटनच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ट्यूलिप सिद्दीकी यांनी राजीनामा देताना म्हटले आहे की, अर्थमंत्री पदावर कायम राहिल्याने सरकारच्या कामात अडथळा येऊ शकतो, त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला.
युनुस यांची मागणी
मोहम्मद युनुस यांनी ट्यूलिप सिद्दीक यांना याबाबत खुलासा करण्यास सांगितले असून, त्यांनी बांगलादेशच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे. युनुस म्हणाले, “संपत्तीची वस्तुस्थिती समोर आली असल्याने सिद्दीक यांनी आता पुढाकार घेत देशाच्या जनतेसमोर सत्य स्पष्ट केले पाहिजे.” बांगलादेशचे नागरिक आता या संपत्तीची परतफेड होईल आणि दोषींवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.