'झुकेगा नहीं साला…', हार्ट ॲटकनंतरही कामाचा उत्साह कायम; पठ्ठ्याने डॉक्टरांनाही मारले फाट्यावर (फोटो सौजन्य: iStock)
बिजिंग: चीनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कामाच्या ताणामुळे हुनान प्रांतातील चांगशा रेल्वेस्टेशनवर एका 40 वर्षीय पुरूषाला हृदयविकाराचा झटका आला. मात्र धक्कादायक बाब म्हणजे शुद्धीवर आल्यानंतरही या व्यक्तीला कामावर जाण्याची गडबड होती. डॉक्टरांनी या व्यक्तीला आराम करण्याचा सल्ल्याकडेही त्याने दुर्लक्ष केले. मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या वसंत महोत्सवाच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही घटना घडली.
शुद्धीवर आल्यावर कामावर जाण्याची चिंता
हा व्यक्ती हाय-स्पीड ट्रेन पकडण्यासाठी रेल्वे स्थानकावर रांगेत थांबला असताना अचानक कोसळला. चीनच्या मीडियारिपोर्टनुसार, याला हृदयविकाराचा झटका आल्याचे दिसताच रेल्वे स्थानकातील कर्मचाऱ्यांनी त्वरित डॉक्टरांना बोलावले. सुमारे 20 मिनिटांनंतर त्याला शुद्ध आली. पण त्यानंतर जे घडले ते धक्कादायक होते. शुद्धीवर येताच या व्यक्तीने कामावर जाण्याची चिंता व्यक्त केली. डॉक्टरांनी त्याला लगेच रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला, कारण त्याची प्रकृती गंभीर असू शकते.
मात्र, या व्यक्तीने रुग्णालयात जाण्यास स्पष्ट नकार दिला आणि “मला काही झालेले नाही, मला फक्त कामावर वेळेत पोहोचायचे आहे,” असे सांगत डॉक्टरांशी वाद घालण्यास सुरुवात केली. डॉक्टरांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की, त्यांना पुन्हा ढटका आल्या जीवही धोक्यात येऊ शकतो. मात्र, तरीही तो उपचार घेण्यास तयार नव्हता. अखेरीस, काही वेळानंतर त्याने वैद्यकीय तपासणीसाठी अँब्युलन्समध्ये जाण्यास संमती दिली.
चीनमध्ये वाढता कामाचा तणाव आणि आर्थिक दडपण
सध्या या घटनेनंतर चीनमधील कामाच्या तणावाबाबत आणि आर्थिक दडपणावर मोठी चर्चा सुरु झाली. या घटनेबद्दल सध्या सोशल मीडियावर देखील चर्चा सुरु आहे. अनेकांनी या घटनेवर आश्चर्य व्यक्त केले आहे. हार्ट ॲटकच्या झटक्यानंतर माणूस शुद्धीवर आला आणि त्याच्या डोक्यात पहिली गोष्ट आली ती म्हणजे पैसे कमावण्याची गरज!असे लोकांनी म्हटले आहे. तसेच अलीकडे अनेक लोक याच तणावातून जात आहेत, घराचे कर्ज, मुलांचे शिक्षण आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या, यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा ताण वाढत आहे.
चीनमध्ये वाढते कामाचे तास, सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत, आठवड्यात 6 दिवस काम यामुळे अनेक कर्मचारी प्रचंड तणावाखाली आहेत. मोठ्या प्रमाणावर लोक वाढत्या महागाईमुळे आणि स्थिर आर्थिक परिस्थितीसाठी अहोरात्र मेहनत करत आहेत. परिणामी, स्वास्थ्याचा बळी जात आहे आणि मानसिक तणावही वाढत आहे. ही घटना कामाच्या वाढत्या दडपणाचा आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याच्या मानसिकतेचा जिवंत उदाहरण आहे.