Bird Flu Death: अमेरिकेत बर्ड फ्लूमुळे पहिल्या मानवी मृत्यूची नोंद; व्यक्तीला H5N1 व्हायरसची झाली होती लागण(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉश्गिंटन: अमेरिकेत बर्ड फ्लूमुळे पहिला मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. लुईझियाना राज्यातील आरोग्य विभागाने अमेरिकेत बर्ड फ्लूमुळे (H5N1) पहिल्या मानवी मृत्यूची नोंद केली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 65 वर्षीय रुग्णाचा बळी गेला असून त्याला आधीच काही गंभीर आरोग्य समस्या होत्या. हा रुग्ण अत्यंत संसर्गजन्य एवियन इन्फ्लुएन्झा (HPAI) किंवा H5N1 व्हायरसच्या संसर्गामुळे ग्रस्त होता असे लुईझियाच्या आरोग्य विभागाने म्हटले.
पंक्ष्यांच्या संपर्कात आल्याने H5N1 ची लागण
ही घटना लुईझियाना तसेच अमेरिकेत बर्ड फ्लूमुळे झालेल्या पहिल्या मानवी मृत्यूची नोंद म्हणून महत्त्वपूर्ण मानली जात आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, रुग्ण जंगली पक्ष्यांच्या संपूर्कात आल्यामुळे H5N1 व्हायरसने संक्रमित झाला. नंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. तपासादरम्यान असे आढळून आले की, हा संसर्ग मानवी संपर्काद्वारे पसरलेला नाही. आरोग्य विभागाने हेही स्पष्ट केले आहे की, देशातील इतर भागांत कोणत्याही मानवी संसर्गाची नोंद झालेली नाही, आणि ही घटना एकट्या घटनेपुरती मर्यादित आहे.
सार्वजनिक आरोग्यावर परिणाम
लुईझियाना आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बर्ड फ्लूमुळे सर्वसामान्य जनतेला संसर्ग होण्याचा धोका सध्या कमी आहे. तथापि, ज्या लोकांचा पक्षीपालन, कोंबड्यांचे उत्पादन, किंवा इतर संभाव्य संक्रमित प्राण्यांशी संपर्क असतो, त्यांना अधिक धोका असतो. त्यामुळे आरोग्य विभागाने लोकांना सल्ला दिला आहे की, जंगली पक्ष्यांशी किंवा H5N1 व्हायरसने संक्रमित होऊ शकणाऱ्या प्राण्यांशी थेट संपर्क टाळावा.
H5N1 व्हायरसविषयी CDCची माहिती
यूएस सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) च्या अहवालानुसार, आतापर्यंत अमेरिकेत बर्ड फ्लूमुळे 66 मानवी प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ज्या राज्यांमध्ये बर्ड फ्लूचे रुग्ण आढळले आहेत, त्यामध्ये कॅलिफोर्निया, कोलोरॅडो, आयोवा, लुईझियाना, मिशिगन, ओरेगन, मिसुरी, वॉशिंग्टन, विस्कॉन्सिन, आणि टेक्सास यांचा समावेश आहे. लुईझियानामधील या प्रकरणाने H5N1 व्हायरसच्या संसर्गामुळे बर्ड फ्लूच्या पहिल्या मानवी मृत्यूची नोंद झाली आहे.
जरी सध्याचा धोका मर्यादित असला तरी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सजग आहेत. लोकांनी योग्य खबरदारी घेऊन जंगली प्राण्यांच्या संपर्कापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा सल्ला मानावा. यासोबतच, कोंबडी उत्पादन क्षेत्रातील कामगारांनी योग्य सुरक्षा उपकरणे वापरणे आणि व्हायरसविरोधी प्रतिबंधक उपाय करणे महत्त्वाचे ठरते. संसर्गजन्य आजारांच्या संभाव्य वाढीवर लक्ष ठेवणे आणि वेळीच उपाययोजना करणे ही सध्याच्या परिस्थितीत काळाची गरज आहे.