बांगलादेशचा भारतावर 1975 च्या सीमा कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप; बॉर्डर फेंसिंग तणावात वाढ(फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
ढाका: एकीकडे भारत आणि बांगलादेशमध्ये हिंदूवरील अत्याचारावरुन विवाद सुरु आहे तर दुसरीकडे दोन्ही देशांतील सीमेवरील तणावात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे सीमारेषेवर फेंसिंग करण्यासंदर्भातील वाद. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने ढाका येथील भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना तातडीने बोलावून या विषयावर चिंता व्यक्त केली आहे. या चर्चेत बांगलादेशच्या परराष्ट्र सचिव मोहम्मद जशीम उद्दीन यांनी भारताच्या वर्तणुकीविषयी स्पष्ट नाराजी व्यक्त केली.
वादाचे मूळ कारण
मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशने भारतावर आरोप केला आहे की, भारत पाच ठिकाणी फेसिंग करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी या प्रयत्नाला 1975 च्या सीमा कराराचे उल्लंघन म्हटले आहे. 4,156 किमी लांब सीमारेषेवर भारताने आतापर्यंत 3,271 किमीवर कंटीले तार लावले आहेत. उर्वरित 885 किमीवर फेंसिंग करणे बाकी आहे, परंतु या प्रक्रियेला बांगलादेशचा विरोध आहे.
बांगलादेशची भूमिका
बांगलादेशच्या गृहमंत्रालयाचे सल्लागार लेफ्टनंट जनरल जहांगीर आलम यांनी सांगितले की, सीमा सुरक्षेसाठी फेंसिंग केल्याने स्थानिक नागरिक आणि बॉर्डर गार्ड बांग्लादेश (BGB) यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यांनी असा आरोप केला की, 1974 च्या करारानुसार, सीमा रेषेच्या 150 गजाच्या आत कोणतेही बांधकाम दोन्ही देशांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. 1974 च्या कराराअंतर्गत, बांगलादेशने बेरूबाडी भारताला हस्तांतरित केले होते, तर भारताने तीन बीघा कॉरिडॉर बांगलादेशाला 24 तास खुला ठेवण्याचे मान्य केले होते. मात्र, बांगलादेशचा आरोप आहे की भारताने हा कॉरिडॉर पूर्वी काही वेळेसाठीच खुला ठेवला होता.
भारताची भूमिका
बांगलादेशच्या या आरोपावर भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी फेंसिंगसंदर्भात दोन्ही देशांत आधीच सहमती झाले असल्याचे सांगितले. त्यांनी सीमावर्ती भागांतील तस्करी, गुन्हेगारी आणि मानव तस्करी थांबवण्यासाठी फेंसिंग गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. तसेच, भारतीय सीमा सुरक्षा दल (BSF) आणि बांगलादेशमधील समकक्ष संस्थांदरम्यान चर्चेची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.
वादाचे परिणाम
सीमारेषेवरील फेंसिंगमुळे भारत आणि बांगलादेशमधील ऐतिहासिक संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. बांगलादेशने भारताला सहकार्याची विनंती केली आहे, तर भारताने आपली सुरक्षा आणि तस्करीविरोधी उपाय यासाठी फेंसिंग गरजेचे असल्याचे ठामपणे मांडले आहे. दोन्ही देशांमध्ये हा वाद चर्चेतून सोडवला जाईल, अशी अपेक्षा आहे.
तुर्की-पाकिस्तान-बांगलादेश युती
एकीकडे बांगलादेश आणि भारतामध्ये फेसिंग आणि हिंदूंवरील अत्याचारामुळे संबंध बिघडच असताना याचा फायदा तुर्की आणि पाकिस्तानाला होत आहे. बांगलादेश तुर्की आणि पाकिस्तानसोबत मिळून विविध क्षेत्रांमध्ये संबंध प्रस्थापित करत आहेत. यामुळे भारतासाठी नवीन धोका निर्माण झाला असून भारताला सतर्क राहण्याची गरज असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.