भारत-पाक तणावच्या परिस्थितीचे पोर्तुगालमध्ये पडसाद; भारतीय दुतावासाने दिले आंदोलकांना चोख प्रत्युत्तर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूर मोहीमेंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कारवाईनंतरही पाकिस्तान सुधारलेला नाही. दोन्ही देशांत शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. परंतु पाकिस्तानचे मंत्री भारताला अजूनहू धमक्या देत आहेत. अशातच काही पाकिस्तानी लोकांनी विदेशातील भारतीय दूतावासाबाहेर निदर्शने काढली आहे. नुकतेच पोर्तुगालमध्ये भारतीय दुतावासाजवळ पाकिस्तानींनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला.
मिळालेल्या माहितीनुसार, पोर्तुगालच्या लिस्बनमध्ये भारतीय दुतावासाबाहेर पाकिस्तानी लोकांनी निदर्शनाचे आयोजन केले होते. परंतु भारतीय दुतावासाच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानींच्या या निदर्शनांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
पोर्तुगालमध्ये भारतीय दूतावासाबाहेर पाकिस्तानी लोकांनी निदर्शने काढली. याला उत्तर देताना दूतावासाच्या अधिकार्यांनी इमारतीवर ऑपरेशन सिंदूरचे पोस्टर लावले. या पोस्टवर ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही, असे लिहिण्यात आले होते. याद्वारे भारतीय अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी लोकांना चोख प्रत्युत्तर दिले.
भारतीय दूतावासाने या घटनेती माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पोर्तुगालमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, “आमच्या चॅन्सरी इमारतीजवळ पाकिस्तानने भारताच्या ऑपरेशन सिंदूरला निषेध म्हणून निदर्शन आयोजित केले होते. या निषेधाला ठाम उत्तर देण्यात आले आहे. दूतावासाची सुरक्षा सुनिश्चिच करण्यासाठी आम्ही पोर्तुगाल सरकार आणि पोलिसांचे आभार मानतो.तसेच भारत पाकिस्तानच्या हताश चिथावण्यांना घाबरणार नाही. आमचा निश्चय दृढ आहे.” अशा स्पष्ट शब्दात भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानींना उत्तर दिले.
Embassy of India @IndiainPortugal
responded firmly with ‘Operation Sindoor’ to the cowardly protest organized by Pakistan near our Chancery building. We thank the Government of Portugal and It’s police authorities for their support in ensuring the safety and security of the… pic.twitter.com/63s951jH1R— India in Portugal (@IndiainPortugal) May 18, 2025
याच वेळी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार चीनच्या दौऱ्यावर रवाना झाले आहे. चीनमध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि चीन अशी तीन देशांची त्रिपक्षीय बैठक होणार आहे. यासाठी इशाक दार चीनला गेले आहेत. मंगळवारी (२० मे) ही बैठक होणार आहे. परंतु ही त्रिपक्षीय बैठक भारतासाठी धोक्याची मानली जात आहे. चीनने सुरुवातीपासून पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानने भारताच्या ऑपरेशन सिंदूर कारवाईला योग्य म्हटले आहे. परंतु चीन आणि पाकिस्तानसोबतच्या बैठकीमुळे अफगाणिस्तान नेमका कोणाच्या बाजूने आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अनेक तज्ज्ञांनी भीती व्यक्त केली आहे की, तिन्ही देश मिळून भारतविरोधी डाव रचत आहे. परंतु अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही. दक्षिण आशियातील वाढता तणाव कमी करण्याच्या उद्देशाने ही बैठक होणार असल्याचे मानले जात आहे.