शशी थरूर यांची टीम निघाली, अमेरिकेत करणार पाकिस्तानचा पर्दाफाश; ओवेसी गरजणार आखाती देशांमध्ये ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Shashi Tharoor US visit : भारत सरकारकडून सीमापार दहशतवाद, ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानकडून सुरू असलेल्या कटकारस्थानांविरोधात जागतिक स्तरावर भारताची भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी विविध सर्वपक्षीय शिष्टमंडळे जगभरात पाठवली जात आहेत. यामध्ये काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील एक पथक अमेरिकेसह दक्षिण अमेरिकेतील देशांना भेट देणार आहे, तर भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील संघ सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन आणि अल्जेरिया या आखाती व आफ्रिकन देशांना भेट देणार आहे.
तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ अमेरिका, गयाना, कोलंबिया, पनामा आणि ब्राझील या देशांना भेटी देणार असून, तेथे पाकिस्तानकडून रचल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवायांविषयी माहिती देणार आहे. भारताच्या शांततापूर्ण धोरणाचे समर्थन करताना, हे पथक जागतिक व्यासपीठावर पाकिस्तानचा नापाक चेहरा उघड करणार आहे.
या शिष्टमंडळात शांभवी चौधरी (लोक जनशक्ती पार्टी), जीएम हरीश बालयोगी (तेलुगू देसम), सरफराज अहमद (झारखंड मुक्ती मोर्चा), भाजपचे भुवनेश्वर कलिता आणि शशांक मणि त्रिपाठी, शिवसेनेचे मिलिंद देवरा, तसेच काही माजी मंत्री व राजनयिकांचा समावेश आहे. हे सर्वजण विविध देशांमध्ये राजकीय, सामाजिक आणि रणनीतिक संवादातून भारताची बाजू प्रभावीपणे मांडतील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताची तिहेरी जबाबदारी; रशियाची लज्जास्पद भूमिका आणि चीनचा पाकिस्तानला पडद्यामागून पूर्ण पाठिंबा
भाजप नेते बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील दुसरे महत्त्वाचे शिष्टमंडळ सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन आणि अल्जेरियाला भेट देणार आहे. या पथकात असदुद्दीन ओवैसी (AIMIM), भाजपचे निशिकांत दुबे, रेखा शर्मा, फंगन कोन्याक, नामांकित खासदार सतनाम संधू, माजी मंत्री गुलाम नबी आझाद आणि माजी परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला यांचा समावेश आहे. या दौऱ्यादरम्यान, भारताच्या संप्रभुतेला धोका देणाऱ्या दहशतवादी कारवायांविषयी माहिती देत भारताच्या अडिग भूमिकेची जाणीव जगाला करून देण्यात येईल.
भाजपचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ यूके, फ्रान्स, जर्मनी, इटली, डेनमार्क आणि युरोपियन युनियन यांसारख्या महत्त्वाच्या युरोपीय देशांना भेट देणार आहे. या शिष्टमंडळात दग्गुबती पुरंदेश्वरी, प्रियंका चतुर्वेदी, समिक भट्टाचार्य, गुलाम नबी खटाना, अमर सिंह, एमजे अकबर आणि पंकज सरण यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ इजिप्त, कतार, इथिओपिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांना भेट देणार आहे. या पथकात राजीव प्रताप रुडी, मनीष तिवारी, अनुराग ठाकूर, विक्रमजीत साहनी, माजी मंत्री मुरलीधरन, आनंद शर्मा आणि माजी राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांचा समावेश आहे.
या सर्व शिष्टमंडळांना मार्गदर्शन करण्यासाठी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बैठक घेतली होती. यामध्ये शिष्टमंडळांनी विविध देशांमध्ये भारताचा संदेश नेमकेपणाने पोहोचवावा असे निर्देश देण्यात आले. या मोहिमेचा उद्देश आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताच्या सुरक्षाविषयक चिंता आणि दहशतवादविरोधी लढ्यातील भूमिका स्पष्ट करणे हा आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जर हार्वर्डमधील राहायचे असेल तर! भारतीयांसह परदेशी विद्यार्थ्यांना 72 तासांच्या आत पूर्ण कराव्या लागणार ‘या’ 6 अटी
ही भारताची एकसंध राजकीय आणि धोरणात्मक मोहीम असून, विविध पक्षांचे नेते एकत्र येऊन देशाच्या आंतरराष्ट्रीय हितासाठी भूमिका बजावत आहेत. पाकिस्तानच्या कुरापती, सीमापार दहशतवाद आणि ऑपरेशन सिंदूरच्या अनुषंगाने भारताची आक्रमक परराष्ट्र नीती आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे.