इराणची डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'Gaza Plan' वर तीव्र टिका; अयातुल्ला खामेनेई म्हणाले... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
तेहरान: सध्या मध्यपूर्वेतील देशांमध्ये गाझाचा पुनर्विकासावरुन मोठे युद्ध सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टी ताब्यात घेऊन तेथे वसाहती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यांच्या या धोरणाला अनेक युरोपीय देशांकडून विरोध होत आहे. याच दरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांनी देखील ट्रम्प यांच्या गाझा प्लॅनवर तीव्र टीका करत विरोध केला आहे.
गाझा प्लॅन मूर्खतापूर्ण
खामेनेई यांनी म्हटले आहे की, गाजा आणि पॅलेस्टाईनसाठी अमेरिकेची योजना मूर्खतापूर्ण असून ती कधीही यशस्वी होणार नाही. त्यांनी म्हटले की, “ट्रम्प यांनी अल्पावधीत प्रतिरोध संपवण्याचा दावा केला होता, ते आता प्रतिरोधक लढणाऱ्यांकडून आपल्या कैद्यांच्या छोट्या गटांची देवाणघेवाण करत आहेत आणि यासाठी मोठ्या संख्येने पॅलेस्टाईनी कैद्यांना सोडत आहेत.” अशी माहिती चीनच्या सिन्हुआ वृत्तसंस्थेने दिली.
खामेनेई यांनी इस्लामिक जिहाद चळवळीचे महासचिव जियाद अल-नखलेह आणि त्यांच्या प्रतिनिधींचे तेहरानमध्ये स्वागत केले. यावेळी नखलेह यांनी इराणचे प्रतिरोधासाठी पाठिंब्याबद्दल आभार मानले. यावर खामेनेई यांनी, “आता जागतिक जनमत पॅलेस्टाईनच्या बाजूने असल्यामुळे गाजा आणि प्रतिरोधकांच्या सहमतीशिवाय कोणतीही योजना यशस्वी होणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले.
ट्रम्प यांचा प्रस्ताव
डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच गाझाच्या पॅलेस्टिनी नागरिकांना शेजारील देशांमध्ये हलवण्याचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावानुसार, गाझा सोडणाऱ्या लोकांना परतण्याची मुभा दिली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. यावर अनेक देश आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने कठोर टीका केली आहे. मात्र, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्रम्प यांच्या या प्रस्तावाला पाठिंबा दिला. नेतन्याहू म्हणाले की, “ही योजना इस्रायलसाठी अनेक संधींची दारे उघडेल.”
इस्त्रायल हिजबुल्लाह युद्धविराम
दरम्यान, इस्रायलचे सैन्य दक्षिण लेबनानच्या काही भागांतून परतले आहे, मात्र काही ठिकाणी अद्याप त्यांची उपस्थिती आहे. हिजबुल्लाहसोबत झालेल्या युद्धविराम करारानुसार, माघारीसाठी दिलेली वेळ संपली असूनही इस्रायलने 18 फेब्रुवारीपर्यंत माघार टाकण्याचे निश्चित केले आहे.
हिजबुल्लाहचे महासचिव नईम कासिम यांनी धमकी दिली की, “इस्रायलने दिलेल्या वेळेत पूर्ण माघार घ्यावी, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील.” इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्त्रायल काट्ज यांनी सैन्याच्या तैनातीला दुजोरा दिला असून हिजबुल्लाहने कोणतेही उल्लंघन केल्यास गंभीर कृतीचे संकेत दिले आहेत.