इस्लामाबादमध्ये ‘रेड अलर्ट’! मुसळधार पावसाने पाकिस्तानमध्ये हाहाकार; ८८३ जणांचा मृत्यू, शेकडो गावे पाण्याखाली ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
पाकिस्तान सध्या भीषण नैसर्गिक आपत्तीशी झुंजतो आहे. जून महिन्याच्या अखेरीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण देशाला अक्षरशः कोंडीत पकडले आहे. सतत पडणाऱ्या या मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (NDMA) आकडेवारीनुसार, आतापर्यंत ८८३ नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत, तर १,२०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
पाकिस्तानातील खैबर-पख्तूनख्वा (Khyber Pakhtunkhwa) प्रांत हा या आपत्तीचा सर्वाधिक बळी ठरला आहे. येथे एकट्याच ४८८ नागरिकांचा मृत्यू झाला असून ३६० हून अधिक जखमी झाले आहेत. डोंगराळ भागात नद्यांना आलेल्या पुरामुळे घरे वाहून गेली, पूल कोसळले आणि डोंगरांवर भूस्खलनाची भीतीही वाढली आहे.
सिंधमध्ये ५८ जणांचा बळी
गिलगिट-बाल्टिस्तान (POGB) मध्ये ४१ मृत्यू
पाकव्याप्त काश्मीर (POK) मध्ये ३८ जणांचा मृत्यू
बलुचिस्तानमध्ये २६ मृत्यू
इस्लामाबादमध्ये ९ नागरिकांचा मृत्यू
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, फक्त बुधवारी रात्री उशिराच झालेल्या घटनांमध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला. यात एक मुलगा इस्लामाबादमध्ये तर दुसरा पाकव्याप्त काश्मीरमध्ये आपत्तीचा बळी ठरला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Kim Ju Ae : अंतर्गत खेळी की पितृसत्ताक व्यवस्थेला आव्हान? मोठा मुलगा असतानाही किम जोंग उनची मुलगी होणार पुढची हुकूमशहा
पाकिस्तान हवामान विभागाने (PMD) इशारा दिला आहे की वरच्या भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे लाहोर, गुजरांवाला, रावळपिंडी आणि इस्लामाबाद या शहरांत शहरी पूर येण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
पंजाबमधील गंडा सिंग वाला भागातील सतलज नदीची पाणीपातळी विक्रमी उंचीवर पोहोचली आहे. त्याचबरोबर चिनाब, रावी आणि सतलज नद्यांचा संगम असलेल्या पंजनाद परिसरात पुढील काही दिवसांत पूरस्थिती आणखी भीषण होऊ शकते. हवामान विभागाने इशारा दिला आहे की या पुरामुळे हजारो एकर शेती जमीन पाण्याखाली जाईल तसेच शेकडो गावे धोक्यात येतील.
आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार—
पंजाबच्या झांग जिल्ह्यातील २६१ गावे बुडाली
मुझफ्फरगड जिल्ह्यातील २४ गावे जलमय
पूरामुळे ६,००० हून अधिक गुरेढोरे मृत्युमुखी
देशभरात ९,२०० हून अधिक घरे उद्ध्वस्त
२४० पूल कोसळले आणि ६७० किमी रस्ते वाहून गेले
पूरग्रस्त भागातील नागरिकांचे हाल अक्षरशः वर्णनातीत आहेत. हजारो कुटुंबे उघड्यावर रात्र काढत आहेत. महिला, लहान मुले आणि वयोवृद्धांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासनाने मोहिमा सुरू केल्या आहेत. मात्र वाहतूक मार्ग बंद झाल्यामुळे मदत कार्य हळूहळू होत आहे. एका पीडित शेतकऱ्याने स्थानिक माध्यमांशी बोलताना दुःख व्यक्त केले, “आमचं घर, आमचं शेत, आमची जनावरे… सगळं काही वाहून गेलं. आता पुढे कसं जगायचं हा प्रश्न आम्हाला भेडसावत आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Yudh Abhyas 2025 : ड्रोन विरुद्ध काउंटर-ड्रोन; हिमालयात धोका? अलास्कातील भारत-अमेरिका युद्ध सरावामागे ‘मोठं’ गुपित
एनडीएमएने इशारा दिला आहे की पुढील १२ ते २४ तास देशासाठी अधिक धोकादायक ठरू शकतात. अजूनही मुसळधार पाऊस सुरू राहणार असल्यामुळे पूरस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती वर्तवली जात आहे. प्रशासनाकडून आपत्कालीन केंद्र कार्यरत ठेवण्यात आले आहे, तर स्थानिक सैन्य आणि पोलिस दल बचाव व मदतकार्यात गुंतले आहेत.