फोटो सौजन्य: सोशल मीडिया
कैरो: इस्रायली सैन्याने उत्तर गाझामध्ये तीव्र आक्रमण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायली सैन्याने टॅंक आणि तोफा घेऊन गाझा पट्टीत प्रवेश करत हवाई हल्ल्यांची मालिकाच सुरू केली. लष्कराने शत्ती शरणार्थी शिबिरातील एका शाळेवर मोठा हवाई हल्ला केला. या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. इस्रायली लष्कराने या हल्ल्यांचे स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, त्यांनी हमासच्या कमांड सेंटरला लक्ष्य केले.
हमास नागरी सुविधांचा गैरफायदा घेत आहे
मिळालेल्या माहितीनुसार, हमास नागरी सुविधांचा गैरफायदा लष्करी उद्देशांसाठी घेत आहे यामुळे हमासला संपुष्टात आणण्यासाठी हल्ले करण्यात आले आहेत. मात्र हमासने हा आरोप फेटाळून लावला आहे. इस्रायली लष्कराच्या हल्ल्यांमुळे उत्तर गाझामधून स्थलांतरित होण्याची एक नवी लाट निर्माण झाली आहे. लष्कराचे टॅंक उत्तर गाझातील बाट लाहिया शहरात पोहोचताच लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि चेंगराचेंगरी झाली होती.
‘आम्ही परतणार नाही’- पॅलेस्टिनी नागरिक
यानंतर देखील महिनाभर इस्रायली सैन्याने पुन्हा उत्तर गाझावर हल्ले सुरू ठेवले. इस्त्रायलच्या या नव्या आक्रमणामुळे पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये भीती पसरली आहे यामुळे आता त्यांना गाझामधील त्यांच्या मूळ वस्तीवर परत येता येणार नाही असे अनेक नागरिंकाचे म्हणणे आहे. परतलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांनी आपल्या थोड्याफार साधनसामग्रीसह शाळांमध्ये आणि अन्य शरणस्थानांमध्ये आश्रय घेतला आहे.
इस्त्रायली सैन्याचे घरे रिकामे करण्याचे संदेश
पॅलेस्टिनी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायली सैन्य ड्रोनद्वारे संदेश प्रसारित करत आहे. या संदेशांमध्ये घर रिकामे करण्याचे आदेश दिले जात आहेत. तसेच या संदेशांचा प्रसार सोशल मीडियावर आणि रहिवाशांच्या मोबाईलवरही होत आहे.नागरिकांनी आरोप केला आहे की, इस्रायलकडून सर्वत्र बॉम्बफेक सुरू आहे आणि लोकांना रस्त्यावर किंवा त्यांच्या घरात मारले जात आहे.
उत्तरी गाझामध्ये गंभीर परिस्थिती
पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, इस्त्रायलचे हमासला संपुष्टात आणण्याचे ऑपरेशन सुरू झाल्यापासून जबलिया, बीट लाहिया आणि बीट हानौन या भागांमध्ये कोणतीही मदत पोहोचलेली नाही. यामुळे लोकांना जबलिया शहरातून रिकामे करण्यास भाग पाडले गेले, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, उत्तर गाझामध्ये स्थलांतरित झालेल्यांना परत येण्याची परवानगी नाकारल्याचे आरोप इस्रायली लष्कराने फेटाळले असले तरी परिस्थिती गंभीर असून पॅलेस्टिनींची परतण्याची आशा धूसर होत चालली आहे.