Mehul Choksi Arrested: फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी अखेर अटकेत; बेल्जियममधून भारतात आणण्याची तयारी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
ब्रुसेल्स/नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) ऐतिहासिक कर्ज घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला अखेर बेल्जियम पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल १३,५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यानंतर भारतातून फरार झालेला चोक्सी शनिवारी (१२ एप्रिल २०२५) बेल्जियमच्या अँटवर्प शहरात पोलिसांच्या हाती लागला. केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) च्या अपीलवरून ही अटक करण्यात आली असून, तो सध्या बेल्जियममधील तुरुंगात आहे.
मेहुल चोक्सीने २०१८ मध्ये आपल्या पुतण्या नीरव मोदीसह भारतातून पलायन केलं. यापूर्वीच पंजाब नॅशनल बँकेमध्ये झालेल्या १३,५०० कोटी रुपयांच्या फसवणुकीचे प्रकरण उघड झाले होते. हा घोटाळा भारतातील दुसरा सर्वात मोठा बँक घोटाळा मानला जातो. भारत सोडल्यानंतर चोक्सीने अँटिग्वा आणि बारबुडा या लहानशा कॅरेबियन देशाचे नागरिकत्व घेतले होते. २०२१ मध्ये तो डोमिनिकामध्ये पकडला गेला होता, तेव्हा तो क्युबाला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. यानंतरही त्याने दावा केला होता की, त्याच्याविरोधात राजकीय कट रचला गेला आहे आणि भारत सरकारने त्यांच्या मालमत्ता बेकायदेशीरपणे जप्त केल्या आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जगभरात भारताची छाप! 2 लाख कोटींची स्मार्टफोन निर्यात, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात ऐतिहासिक यश
Mehul Choksi Arrested In Belgium: Fugitive Businessman To Be Extradited Next After Tahawwur Rana?#MehulChoksi #Belgium #TNCards
Read More: https://t.co/HoqFNO2xZa pic.twitter.com/l1NzU4iaL8
— TIMES NOW (@TimesNow) April 14, 2025
credit : social media
चोक्सी सध्या बेल्जियमच्या अँटवर्प शहरात राहत होता, जिथे तो आपल्या पत्नी प्रीती चोक्सीसोबत वास्तव्यास होता. प्रीतीकडे बेल्जियमचे नागरिकत्व असून, मेहुलकडेही ‘F रेसिडेन्सी कार्ड’ असल्याचे समोर आले आहे. तो उपचारासाठी अँटिग्वाहून बेल्जियममध्ये आला होता, असेही वृत्त आहे. बेल्जियम पोलिसांनी त्याला अटक करताना, मुंबई न्यायालयाने २०१८ आणि २०२१ मध्ये जारी केलेल्या दोन अटक वॉरंट्सचा हवाला दिला. CBI आणि ED यांच्याकडून सतत पाठपुरावा केल्यानंतर अखेर ही अटक करण्यात आली.
चोक्सी सध्या तुरुंगात असून, भारतीय यंत्रणांनी त्याच्या प्रत्यार्पणासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तज्ञांच्या मते, चोक्सी आरोग्याच्या कारणावरून बेल्जियम न्यायालयात जामीन आणि तातडीच्या सुटकेची याचिका दाखल करू शकतो. मात्र, CBI आणि ED यांच्याकडे उपलब्ध पुरावे आणि न्यायालयीन आदेशांच्या आधारे भारत त्याचा प्रत्यार्पण मिळवण्यात यशस्वी ठरू शकतो.
या घोटाळ्यातील दुसरा आरोपी नीरव मोदी सध्या लंडनमध्ये लपून बसला आहे आणि त्याच्या प्रत्यार्पणासाठीही भारत प्रयत्न करत आहे. ब्रिटनमधील न्यायालयात त्याची सुनावणी सुरू असून, लवकरच त्यावर निर्णय येण्याची शक्यता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : हमासला संपवण्यासाठी इस्रायलने उचलले शेवटचे पाऊल! मोराग कॉरिडॉरवर ताबा, गाझामध्ये मानवी संकट गहिरे
मेहुल चोक्सीची अटक ही भारत सरकार आणि तपास यंत्रणांसाठी मोठी कामगिरी मानली जात आहे. तब्बल सात वर्षांनंतर फरार आरोपीला अटक करणे हे देशाच्या वित्तीय सुरक्षेसाठी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या विश्वासार्हतेसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. आता सर्वांच्या नजरा चोक्सीच्या प्रत्यार्पण प्रक्रियेवर लागल्या असून, लवकरच तो भारताच्या न्यायव्यवस्थेसमोर उभा राहील, अशी अपेक्षा आहे.