PoK Protests : 'प्रत्येक मुलाला मारले जाईल...',मुझफ्फराबादचा मोर्चा ठरवणार काश्मीरचे भविष्य; ६०,००० आंदोलक रस्त्यावर ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
पाकिस्तानच्या छळाने आणि दडपशाहीने गांजलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) जनतेचा संयम आता संपला आहे. गेल्या ३५ दिवसांपासून या भागात पाकिस्तानी सरकार आणि क्रूर लष्कराच्या विरोधात एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक बंड सुरू आहे. परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की, केवळ स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या निष्पाप नागरिकांवर पाकिस्तानी रेंजर्सनी थेट गोळ्या झाडल्या आहेत. गेल्या ३४ ते ३५ दिवसांच्या कालावधीत पाकिस्तानी लष्कराच्या या अमानुष गोळीबारात तब्बल ६५ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु, या मृत्यूच्या तांडवानंतरही आंदोलक मागे हटायला तयार नाहीत, उलट हा संघर्ष आता पाकिस्तानच्या अस्तित्वाला आव्हान देऊ लागला आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधील रावलकोट येथील ईदगाह मैदानावर नुकतीच एक विराट सभा पार पडली. या सभेत ६०,००० हून अधिक आंदोलक एकत्र आले होते. या अथांग जनसागराने दिलेल्या घोषणांनी थेट इस्लामाबाद आणि रावळपिंडी येथील पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय हादरले आहे. “प्रत्येक मुलाला मारले जाईल, पण पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा प्रांत (राज्य) होणार नाही,” अशी गगनभेदी घोषणा यावेळी देण्यात आली. या आंदोलनाने आता एका मोठ्या क्रांतीचे रूप घेतले असून १५ जुलै रोजी निघणारा मुझफ्फराबाद येथील मोर्चा आणि आगामी २७ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुका या संपूर्ण भागाचा इतिहास बदलून टाकतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Egypt Tombs: सोन्याच्या जिभा, दुसऱ्या जगाचा दरवाजा, देवांशी संबंध; इजिप्तमध्ये सापडल्या 2000 वर्षे जुन्या प्राचीन रहस्यमयी 18 कबरी
गेल्या सात दशकांहून अधिक काळ पाकिस्तानने काश्मिरी जनतेची कशी फसवणूक केली, याचा पाढाच आंदोलकांनी जाहीरपणे वाचला. आवामी ॲक्शन कमिटीचे (Awami Action Committee) डॅशिंग सदस्य सरदार जावेद इक्बाल यांनी रावलकोटच्या व्यासपीठावरून पाकिस्तानच्या दांभिकतेवर कडाडून प्रहार केला. ते म्हणाले, “गेल्या ७८ वर्षांपासून आम्हाला श्रीनगर मुक्त करण्याचे ‘चूर्ण’ (स्वातंत्र्याचे खोटे आश्वासन) विकले जात आहे. पण आता हे चूर्ण पूर्णपणे शिळे झाले आहे. हे चूर्ण घेऊन आता तुम्ही रावळपिंडीत (पाकिस्तान लष्कराचे केंद्र) जा, तिथल्या लोकांना ते विका. कारण, काश्मिरी जनता आता हे तुमचे खोटे आश्वासन ऐकणार नाही आणि हे चूर्ण खाणार नाही.”
पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणावर टीका करताना इक्बाल यांनी अत्यंत भावनिक आणि तितकाच आक्रमक युक्तिवाद केला. ते म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना ७८ वर्षे केवळ अंधारात आणि भ्रमात ठेवण्यात आले. ज्या पाकव्याप्त काश्मीरला पाकिस्तान जगासमोर ‘आझाद काश्मीर’ म्हणून मिरवतो, तिथले वास्तव अत्यंत भयानक आहे. तिथल्या स्वातंत्र्याची व्याख्या सांगताना ते म्हणाले, “तुम्ही ज्याला स्वातंत्र्य म्हणता, तिथे आज गरीब जनतेने पोट भरण्यासाठी पीठ मागितले तर गोळी मिळते, घर उजळण्यासाठी वीज मागितली तर गोळी मिळते, पिण्यासाठी पाणी मागितले तर गोळी मिळते आणि हक्काचे शासन मागितले तरी गोळीच मिळते!” परंतु आता या गोळ्यांना काश्मिरी जनता घाबरत नाही, हा लढा आता थांबणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
एकीकडे पाकिस्तानचे सैन्य स्वतःला शिस्तबद्ध म्हणवून घेते, तर दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये याच सैन्याची भुकेलेली आणि लाचार प्रवृत्ती समोर आली आहे. ३५ दिवस चाललेल्या या आंदोलनादरम्यान पाकिस्तानी सैन्याने आणि पोलिसांनी पुन्हा एकदा स्थानिक जनतेची लूटमार सुरू केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील ‘तत्ता पाणी’ (Tatta Pani) या भागातून एक अत्यंत लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. येथील एका स्थानिक व्यापाऱ्याच्या दुकानाचे शटर पाकिस्तानी सैनिकांनी रात्रीच्या अंधारात तोडले. त्या दुकानात शिरून सैनिकांनी खाद्यपदार्थ, किराणा आणि गल्ल्यातील रोकड चोरून नेली.
अवामी ॲक्शन कमिटीने पाकिस्तानी सैन्याच्या आणि पोलिसांच्या या चोरीचा आणि नीच कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जाहीर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण काश्मीरमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रचंड नाचक्की होत आहे. आपल्याच नागरिकांचे अन्न लुटणारे सैन्य हे रक्षक नसून भक्षक आहे, अशी भावना आता प्रत्येक काश्मिरी नागरिकाच्या मनात निर्माण झाली आहे. यामुळे आंदोलकांचा राग अधिकच अनावर झाला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India China ISR Gap : LAC वर चीनचे 300 उपग्रहांचे जाळे, भारताकडे फक्त 15; कशी तोडली जाईल चिनी ‘किल चेन’?
या आंदोलनाचे मुख्य संयोजक सरदार उमर नझीर यांनी रावळकोटच्या ऐतिहासिक व्यासपीठावरून मुझफ्फराबाद येथे निघणाऱ्या प्रस्तावित मोर्चा संदर्भात जनतेला एकत्र येण्याचे थेट आवाहन केले आहे. हा मोर्चा पाकव्याप्त काश्मीरच्या स्वातंत्र्याची आणि हक्कांची नवी पहाट असेल, असे ते म्हणाले. दरम्यान, आंदोलनाचे दुसरे प्रमुख नेते सरदार अमन खान यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील पाकिस्तानच्या कठपुतळी सरकारला आणि पाकिस्तानी अजेंड्याचा प्रचार करणाऱ्या मौलानांना (धार्मिक नेत्यांना) थेट आणि कडक शब्दांत इशारा दिला आहे. ते म्हणाले, “लक्षात ठेवा, १५ जुलैनंतर रावळपिंडीला पळून जाण्याचा विचारही करू नका; हिंमत असेल तर इथेच थांबा, जनता हिशोब पूर्ण करेल.” अमन खान यांनी PoK च्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना तातडीने रावलकोट आणि मुझफ्फराबादच्या दिशेने कूच करण्याचे आवाहन केले आहे.
३४ ते ३५ दिवसांत ६५ निष्पाप काश्मिरी नागरिकांचा पाकिस्तानी रेंजर्सच्या गोळीबारात मृत्यू झाल्याच्या घटनेवर बोलताना अमन खान भावूक झाले, पण त्यांचा निर्धार कायम होता. ते म्हणाले, “जगाच्या इतिहासात जेव्हा जेव्हा हुकूमशाही आणि जुलमी राजवटीविरोधात बंड झाले आहे, तेव्हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि हक्कासाठी लढणाऱ्या बंडखोरांना असेच मारले गेले आहे. हुकूमशहा नेहमीच रक्ताची होळी खेळतो. अशा कठीण परिस्थितीत आपण घाबरून न जाता अधिक धैर्याने आणि ताकदीने हा लढा पुढे नेला पाहिजे.”
पाकव्याप्त काश्मीरमध्ये २७ जुलै रोजी निवडणुका होणार आहेत. परंतु पाकिस्तानच्या पाठिंब्याने निवडणूक लढवणाऱ्या पक्षांच्या नेत्यांना आता गावात पाऊल ठेवणेही कठीण झाले आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्या ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’च्या (PPP) कोटली येथील उमेदवाराच्या ताफ्यावर संतप्त जनतेने हल्ला केला. शनिवारी रात्री कोटली भागात निवडणूक प्रचारासाठी आलेल्या या नेत्याच्या ताफ्यातील एक वाहन स्थानिक नागरिकांनी पेटवून दिले. या घटनेवरून हे स्पष्ट होते की, पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेचा पाकिस्तानच्या लोकशाही नावाच्या ड्रामावरून पूर्णपणे विश्वास उडाला आहे. आता मोठा प्रश्न हाच उरतो की, १५ जुलै रोजी निघणारा मुझफ्फराबादचा हा विराट मोर्चा पाकव्याप्त काश्मीरच्या स्वातंत्र्याचा खरोखरच एक नवीन आणि सुवर्ण अध्याय लिहिणार का? पाकिस्तानची लष्करी राजवट हा जनक्षोभ रोखू शकणार की काश्मीरमध्ये पाकिस्तानचा अंत होणार, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.






