पहलगाम हल्ल्यानंतर सीमा हैदर प्रकरण पुन्हा चर्चेत; पहिल्या पती गुलाम हैदरचा व्हिडिओ व्हायरल ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलत पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सीमा हैदर हिचे प्रकरण चर्चेत आले आहे. २०२३ मध्ये बेकायदेशीर मार्गाने भारतात आलेली सीमा सध्या ग्रेटर नोएडामधील रबुपुरा येथे राहत आहे. या घडामोडींमध्ये आता तिचा पहिला पती गुलाम हैदर याने पाकिस्तानमधून एक व्हिडिओ जारी करत भावनिक आवाहन केले आहे.
गुलाम हैदर या व्हिडिओमध्ये म्हणतो, “मी गेल्या दोन वर्षांपासून माझ्या मुलांसाठी आसुसलो आहे. भारत सरकारने त्यांना पाकिस्तानात परत पाठवावे.” त्याने स्पष्ट शब्दांत सांगितले की सीमाला भारतात ठेवले जाणे अन्यायकारक आहे आणि जर ती परत पाठवली जाऊ शकत नसेल, तर तिला कायद्यानुसार शिक्षा द्यावी. त्याने सीमाला मदत करणाऱ्या वकिल एपी सिंगवरही कठोर शब्दांत टीका केली.
credit : social media
सीमा हैदर ही पाकिस्तानातील रहिवासी असून, मे २०२३ मध्ये PUBG वर झालेल्या ओळखीच्या आधारे भारतात आली होती. तिने सचिन मीणा या युवकाशी लग्न केल्याचा दावा केला आहे. ती सध्या त्याच्या कुटुंबासोबत राहते आणि त्यांच्या मुलाची देखील आई बनली आहे. मात्र, तिचा भारतात प्रवेश पूर्णपणे बेकायदेशीर होता आणि तिच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही, त्यामुळे आता ती सरकारच्या नव्या आदेशांअंतर्गत कारवाईच्या धोक्यात आली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताच्या कारवाईच्या संकेताने पाकिस्तान हादरला; संरक्षण मंत्र्यांचा इशारा, सिंधू पाणी करारावरही चिंता
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारने सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयामुळे, सीमा हैदरवर काय कारवाई केली जाईल याविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत. सध्या सरकारने यावर कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही, परंतु सुरक्षा यंत्रणा तिच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवून आहेत. तज्ञांचे मत आहे की, सीमा हैदरचा भारतात प्रवेश बेकायदेशीर असल्याने तिला परत पाठवले जाणे शक्य आहे. केंद्र सरकारने पहलगाम हल्ल्याला गंभीरपणे घेतले असून वाघा सीमा बंद करण्यात आली आहे, त्यामुळे भविष्यात कठोर निर्णय होण्याची शक्यता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पहलगाम हल्ल्यानंतर भारताची आक्रमक भूमिका; पाकिस्तान सतर्क, अरबी समुद्रात क्षेपणास्त्रांचा सराव सुरू
गुलाम हैदरचा भावनिक व्हिडिओ, सरकारचा कठोर निर्णय आणि सीमाच्या भारतातील बेकायदेशीर उपस्थिती या तिन्ही गोष्टी एकत्र आल्याने प्रकरण पुन्हा उफाळून आले आहे. पुढील काही दिवसात केंद्र सरकारकडून सीमा हैदर प्रकरणावर अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत, तिच्या भवितव्यावर अनिश्चिततेचे सावट कायम आहे.