Sri Lanka News: सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या वृद्धाश्रमात लागलेल्या आगीत १२ जणांचा मृत्यू; संचालकाला अटक ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Sri Lanka elder care center fire Horana 2026 : इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील लाखो लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेला श्रीलंकेतील एक प्रसिद्ध वृद्धाश्रम एका रात्रीत स्मशानभूमीत बदलेल, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. श्रीलंकेच्या पश्चिम प्रांतातील कालुतरा जिल्ह्यातील होराना (Horana) जवळील अंगुरुवाटोटा भागातून एक अत्यंत वेदनादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. येथील ‘मावपिया शेवना सेनेहासे केडेला’ (Mawpiya Sevana Senehase Kedella) या खाजगी वृद्धाश्रमाला बुधवारी सायंकाळी अचानक भीषण आग लागली. या आगीच्या भयंकर ज्वाळांनी संपूर्ण इमारतीला आपल्या विळख्यात घेतले, ज्यामध्ये आतापर्यंत १२ असहाय वृद्ध रहिवाशांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाला आहे. या घटनेने केवळ श्रीलंकाच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवून दिली आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास जेव्हा वृद्धाश्रमातील सर्व वृद्ध संध्याकाळच्या चहा-पाण्याची तयारी करत होते, तेव्हा अचानक इमारतीच्या एका भागात आगीची ठिणगी पडली. सुरुवातीला हा अपघात गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे (Gas Cylinder Explosion) झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात होता; परंतु आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बघता बघता आगीने इतके रौद्ररूप धारण केले की, संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. परंतु, आगीचा वेग इतका जास्त होता की, आत अडकलेल्या वृद्धांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या आगीत १० जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांनी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण गळले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : SPIEF 2026 : मोदींवर दबाव आणणे पाश्चात्त्यांनाच पडणार महागात; पुतिन यांनी भारताला गौरवले जगातील ‘सर्वोच्च विश्वासार्ह भागीदार
‘सेनेहासे केडेला’ (अर्थात स्नेहाचे घरटे) हा वृद्धाश्रम सामान्य आश्रमांसारखा नव्हता. या केंद्राचे सोशल मीडियावर, विशेषतः टिकटॉक आणि इतर प्लॅटफॉर्मवर लाखो फॉलोअर्स होते. येथील कर्मचारी या वृद्धांचे वाढदिवस साजरे करतानाचे, सणांचे आणि त्यांच्या दैनंदिन आनंदाचे व्हिडिओ नियमितपणे शेअर करत असत. या व्हिडिओंमुळे या आश्रमातील अनेक आजी-आजोबा सोशल मीडिया युजर्ससाठी अत्यंत लाडके आणि ओळखीचे चेहरे बनले होते. त्यांच्या चेहऱ्यावरील हसू पाहून अनेकांचा दिवस आनंदात जात असे. मात्र, याच डिजिटल विश्वाला लळा लावणाऱ्या निष्पाप जीवांचा आगीत करुण अंत झाल्याची बातमी समजताच सोशल मीडियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून जगभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
📸 Aftermath of the Anguruwatota tragedy Police say the death toll from the fire at the elders’ home in Batagoda, Anguruwatota, has risen to 12 as of this morning. The director of the home was arrested and remanded until June 11 after being produced before the Horana… pic.twitter.com/a1GvtkW5h9 — NewsWire 🇱🇰 (@NewsWireLK) June 4, 2026
credit – social media and Twitter
घटनेचे गांभीर्य ओळखून श्रीलंकेच्या लष्कराला (Sri Lankan Army) तात्काळ पाचारण करण्यात आले. ज्या वेळी आग लागली, त्या वेळी या निवासी केंद्रात ७0 हून अधिक लोक उपस्थित होते, ज्यामध्ये काही मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींचाही समावेश होता. लष्कराचे जवान, पोलीस आणि स्थानिक तरुणांनी जीवाची बाजी लावून खिडक्या आणि दरवाजे तोडून ५१ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले. या बचावकार्यात ४४ जण सुखरूप सुटले, तर ७ जण गंभीरपणे भाजले गेले आहेत. जखमींवर सध्या होराना बेस हॉस्पिटलमध्ये (Horana Base Hospital) अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. वाचलेल्या वृद्धांना सुरुवातीला बटागोडा कनिष्ठ विद्यालयात तात्पुरते ठेवण्यात आले होते, त्यानंतर लष्कराच्या मदतीने त्यांना गलापथा येथील सुरक्षित शाखेत हलवण्यात आले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ishaq Dar: इशाक दार यांनी अमेरिकेत जाऊन इराणच्या अणुकार्यक्रमाची गुपिते केली उघड? पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण
या हृदयद्रावक दुर्घटनेनंतर प्रशासनाने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. होरानाच्या दंडाधिकारी लकमिणी विदानागमगे (Magistrate Lakmini Vidanagamage) यांनी गुरुवारी सकाळी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली आणि त्यांच्याच उपस्थितीत जळालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. प्राथमिक तपासात वृद्धाश्रमात सुरक्षेच्या कोणत्याही उपकरणांची सोय नसल्याचे आणि गंभीर निष्काळजीपणा झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काही प्रत्यक्षदर्शींनी असा आरोप केला आहे की, आगीच्या वेळी काही वृद्धांना खोलीत लोखंडी साखळदंडानी बांधून ठेवण्यात आले होते, ज्यामुळे त्यांना पळून जाता आले नाही. या गंभीर आरोपांनंतर अंगुरुवाटोटा पोलिसांनी तातडीने कारवाई करत वृद्धाश्रमाच्या संचालकाला/मालकाला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ११ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून, पोलीस या ‘हाऊस ऑफ हॉरर’च्या दाव्यांची सखोल चौकशी करत आहेत.






