फोटो सौजन्य: सोशल मीडिया
काबूल: पाकिस्तानने अफगानिस्तानमध्ये मंगळवारी (24 डिसेंबर 2024) रात्री उशिरा हवाई हल्ले करून पाकिस्तानी तालिबानच्या संशयित तळांना लक्ष्य केले. पक्तिका प्रांताच्या बरमल जिल्ह्यात पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात तणाव आणखी वाढला आहे. या हल्ल्यात 46 नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. यानंतर अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने काबूलमध्ये पाकिस्तानच्या राजदूतांना खडसावले असून हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे.
पाकिस्तानी हल्ल्यांचा तीव्र निषेध
अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हाफिज जिया अहमद यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे हल्ल्याचा तीव्र निषेध करत म्हटले आहे की, डूरंड रेषेच्या सैद्धांतिक सीमेजवळ पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हल्ल्याचा कडक निषेध करत आहोत. त्यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानी हवाई हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील विश्वास कमी करण्याचा प्रयत्न झाला आहे. या हल्ल्यादरम्यान, काबूलमध्ये पाकिस्तानी नागरी प्रतिनिधी अफगाण अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते, त्यामुळे हा हल्ला जाणीवपूर्वक केला गेला असल्याचा आरोप पाकिस्तानवर करण्यात आला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- शेख हसीना प्रत्यार्पण प्रकरणी नवीन वाद; बांगलादेश भारताला पाठवणार ‘रिमाइंडर लेटर’
अफगाणिस्तान सरकारने आपल्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणावर भर देत लष्करी कारवायांवर कडक भूमिका घेतली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, अफगाणिस्तानच्या सीमा सुरक्षेला धक्का लागणे हे “रेड लाईन” आहे. पाकिस्तानने यापुढे असे हल्ले केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला.
पाकिस्तानचे स्पष्टीकरण
पाकिस्तान लष्कराने या हल्ल्यानंतर दावा केला आहे की, 24 डिसेंबरच्या रात्री अफगाणिस्तानातील तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाले आणि टीटीपीचे चार तळ उद्ध्वस्त करण्यात आले. मात्र, तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने हा दावा फेटाळून लावला आहे. तालिबान सरकारने म्हटले आहे की, या हल्ल्यात वजीरिस्तानमधील निर्वासितही बळी पडल्याचे म्हटले आहे.
अफगाणिस्तान-पाकिस्तान तणावाची पार्श्वभूमी
पाकिस्तान आणि तालिबान यांच्यामधील तणावाचा मुख्य मुद्दा म्हणजे अफगाणिस्तानात टीटीपी दहशतवाद्यांचा वाढता प्रभाव म्हटले जात आहे. पाकिस्तानचा आरोप आहे की, अफगाण तालिबान टीटीपी दहशतवाद्यांना आश्रय देत आहे, तर तालिबानने हा आरोप फेटाळून लावला आहे. यामुळे दोन्ही देशांतील तणाव अधिक चिघळला आहे. अफगाणिस्तानने आपली क्षेत्रीय अखंडता आणि सार्वभौमत्व कायम ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची भूमिका घेतली आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यांमुळे संबंधांवर परिणाम होत असून भविष्यात परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे.