वॉशिंग्टन: सध्या गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ सुरु असलेल्या रशिया-यूक्रेनमध्ये संघर्षाचे वातावरण अद्यापही कायम आहे. हा संघर्ष मिटवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरु असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांनी यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. दरम्यान ट्रम्प यांनी माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत पुतिनवर नाराजी व्यक्त केली आहे. या तणावाचे कारण म्हणजे पुतिन यांनी युद्धबंदीच्या चर्चेचांदरम्यान यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यावर केलेली टीका. ही टीका ट्रम्प यांना आवडली नाही. यामुळे ट्रम्प यांनी रशियन तेलावर मोठ्या प्रमाणात कर लादण्याची धमकी दिली आहे.
मुलाखतीदरम्यान ट्रम्प यांनी म्हटले की, पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, यामुळे ते नाराज झाले आहे. पुतिन यांनी म्हटले होते की, झेलेन्स्की यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यांना शांतता करारावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, यूक्रेनच्या संविधानात, देशात मार्श लॉ लागू केल्यानंतर निवडणुका घेता येत नाहीत हे नमूद करण्यात आले आहे. पुतिन यांच्या विधानामुळे ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला असून कडक शब्दांत रशियाला फटकारले आहे.
ट्रम्प यांनी मुलाखतीदरम्यान स्पष्ट सांगितले आहे की, शांतता करार झाला नाही आणि यामध्ये रशियाने अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर रशियन तेलावर 20% ते 25% टक्के कर लादण्यात येईल. तसेच रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांना अमेरिकेसोबत व्यपार करणे कठीण होईल. ट्रम्प यांचे हे विधान पुतिनसाठी धक्कादायक आहे, कारण रशियन अर्थव्यवस्थेचा मोठा भाग तेलाच्या व्यापरावर अवलंबून आहे.
सध्या अमेरिका रशिया-यूक्रेनमध्ये शांतता करार घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या या युद्धामुळे जागतिक स्तरावर अस्थिरता निर्माण झाली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, या आठवड्यात ते पुतिन यांच्याशी संवाद साधतील. काही दिवसांपूर्वी त्यांनी फोनवरुन त्यांच्याशी दीर्घ संवाद साधला होता.
सध्या अमेरिकेने 30 दिवसांच्या युद्धविरामाचा दिलेल्या प्रस्तावर रशियाने नाकारला आहे. यामुळे युद्धबंदीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.शिवाय, यूक्रेनमध्ये आंशिक युद्धबंदी झाली असून काळ्या समुद्रात जहाजांची सुरक्षित हालचाल आणि अणुउर्जा प्रकल्पावर हल्ले न करण्याचा कराराचा समावेश आहे. मात्र, यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे रशिया-यूक्रेनमधील संघर्ष थांबण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.