पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात पोलिसांच्या व्हॅनवर आत्मघाती हल्ला; दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: पाकिस्तानच्या उत्तर पश्चिम भागातील खैबर पख्तूनख्वा प्रदेशात पोलिसांच्या व्हॅनवर आत्मघातकी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या आत्मघाती हल्ल्यात दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ला रविवारी रात्री झाला. दरम्यान हा हल्ला कोणी केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. सध्या याचा तपास सुरु आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पेशावरमधील चमकानी पोलिस स्टेशनच्या हद्दीत रिंग रोडच्या गुरांच्या बाजाराजवळ हा आत्मघातकी हल्ला झाला. हल्लेखोराने पोलिसांच्या व्हॅनवर हल्ला केला अशी माहिती एसएसपी मसूद बंगश यांनी दिली. त्यांनी सांगितले की, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी या घटनेची सविस्तर माहिती मागवली आहे. याच्या एक दिवसापूर्वीच ग्वादरमधील मशिदीजवळही ग्रेनेड हल्ला झाला होता. हल्लेखोरांनी ग्रेनेड फेकल्यानंतर गोळीबार केला. या गोळीबारात एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता.
पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये दहशतवादी हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे सुरक्षा कारवाया देखील करण्यात आल्या आहे. दहशतवाद्यांनकडून पाकिस्तानच्या मुक्य शहरांना लक्ष्य केले जात आहे. विशेषत: खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये हल्ले वाढले आहेत.
दरम्यान पाकिस्तानमध्ये अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच पोलिसांच्या व्हॅनवर हल्ला कोणी केला आणि या हलल्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. हल्ल्याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. घटनास्थळावरुन पुरावे गोळा केले जात आहेत. या हल्ल्यासाठी जबाबादर असलेल्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे.
दरम्यान एककीकडे पाकिस्तान आणि भारतामध्ये पहलगाम हल्ल्यानंतर तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांमध्ये गेल्या चार दिवसांपासून युद्ध सुरु होते. दरम्यान शनिवारी १० मे रोजी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंनी चर्चा केली आणि युद्धबंदी लागू केली आहे. भारतासोबतच सुरु असलेल्या युद्धादरम्यान पाकिस्तानमध्ये यापूर्वीही हल्ला झाला आहे. २८ एप्रिल रोजी पाकिस्तानच्या पेशावर येथे बॉम्बस्फोट झाला होता. तर या स्फोटाच्या दोन दिवसापूर्वीच पाकिस्तानच्या क्वेटा शहरातही हल्ला झाला होता.