फोटो सौजन्य: सोशल मीडिया
कीव: रशिया-युक्रेन युद्ध आता शिगेला पोहोचले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या युक्रेनला लांब पल्ल्यांच्या वापराच्या परवानगी नंतर युक्रेनने रशियावर अमेरिकन क्षेपणास्त्रांचा हल्ला केला. या हल्ल्यांमुळे रशिया संतप्त झाला आहे. यामुळे रशियाकडून मोठा हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनची राजधीनी कीव येथील अमेरिकन दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, रशियाकडून हवाई हल्ल्याच्या शक्यतेबाबत महत्त्वाचा इशारा मिळाला आहे. यामुळे अमेरिकन दूतावास बंद करण्यात आला आहे.
दूतावासाने जारी केलेले निवेदन
अमेरिकन दूतावासाने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी दूतावास कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा ल्ला दिला आहे. तसेच कीवमधील अमेरिकन नागरिकांनी कोणत्याही हल्ल्याचा इशारा मिळाल्यास तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन या निवेदनात करण्यात आले आहे. रशियाकडून हवाई हल्ल्याचा इशारा मिळाल्यानंतर दूतावासाने हे पाऊल उचलले आहे.
रशियन संरक्षण मंत्रालयाची प्रतिक्रीया-
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने देखील एक निवेदन जारी केले आहे. संरक्षण मंत्रीलयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, रशियन सैन्याने युक्रेनने डागलेली लांब पल्ल्यांची क्षेपणास्त्रे पाडली आहेत. याशिवाय, पाडलेल्या क्षेपणास्त्रांचे तुकडे लष्करी भागांत पडले आहे. मात्र यामध्ये कोणतीही वित्त आणि जिवितहानी झालेली नाही. असे रशियन संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. युक्रेनने हल्ल्यात एटीएसीएम क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचे रशियाने म्हटले आहे. मात्र युक्रेनने याबाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
बायडेन यांच्यामुळे युद्ध पेटले
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्यास परवानगी दिली आहे. अमेरिकेने दिलेल्या या मदतीमुळे युक्रेनचे लष्करी सामर्थ्य वाढले आहे, मात्र यामुळे रशियाचा आक्रोशही वाढला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी याआधीच चेतावणी दिली होती की, जर पश्चिम देशांनी युक्रेनला अशा प्रकारचे शस्त्रास्त्र पुरवले तर त्याचा गंभीर परिणाम होईल. त्यांनी असेही म्हटले की, यामुळे नाटो देश, अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियावर एकत्रित हल्ला केल्याचा संदेश जाईल.
युद्धाची वाढती तीव्रता
सध्याच्या परिस्थितीत रशिया आणि युक्रेनमधील तणाव अधिक वाढत आहे. लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर आणि त्यावरून होणाऱ्या संघर्षामुळे हा युद्ध मोठ्या प्रमाणावर विस्तारण्याची शक्यता आहे. कीवमध्ये अमेरिकन दूतावास बंद होणे हे गंभीर स्थितीचे संकेत मानले जात आहेत. यामुळे युक्रेनमधील नागरिक आणि परदेशी प्रतिनिधी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.