शतकाअखेरीस भारताचे तापमान ३ ते ४ अंशांनी वाढण्याचा अंदाज!
आयआयटीएमचा ‘इंडक्लिम’ हवामान बदलाचा अभ्यास
मान्सूनच्या पावसातही वाढीचे संकेत
सुनयना सोनवणे / India Temperature: जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर शतकाच्या अखेरीस भारताच्या हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. सर्वाधिक उत्सर्जनाच्या परिस्थितीत २१०० पर्यंत देशाच्या सरासरी आणि कमाल तापमानात सुमारे तीन अंश सेल्सिअस, तर किमान तापमानात चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याचा अंदाज आहे.
त्याचबरोबर मान्सूनच्या पावसाच्या प्रमाणातही वाढ होण्याचे संकेत मिळाले आहेत. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थेने (आयआयटीएम), पुणे विकसित केलेल्या ‘इंडक्लिम’ या उच्च अचूकतेच्या हवामान माहिती संचातून हे निष्कर्ष समोर आले आहेत. या माहिती संचाचा तांत्रिक अहवाल सप्टेंबर २०२६ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.
आयआयटीएमच्या पृथ्वी प्रणाली प्रारूपावर (आयआयटीएम-ईएसएम) आधारित हा माहिती संच संस्थेच्या हवामान बदल संशोधन केंद्राने विकसित केला आहे. डॉ. संदीप नारायणसेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्य असवाले, प्रितम दास महापात्रा, शामल मराठे, उमाकांत उपरा, प्रवीण व्ही., प्रिया पी., आदिती मोदी, सौरव चॅटर्जी, संदीप इंगळे, अभिषेक सरभूखान, रेजी एम. जॉय, सूरज के. पी., अयंतिका डी. सी. आणि स्वप्ना पी. या शास्त्रज्ञांनी या अभ्यासात योगदान दिले आहे.
Washim News: वाशिम जिल्ह्याच्या जलसाठ्यात वाढ; मध्यमप्रकल्पात २५.५६ टक्के जलसाठा
मूळ हवामान प्रारूपांमध्ये प्रादेशिक पातळीवरील पाऊस आणि तापमानाचे अंदाज वर्तवताना त्रुटी राहतात. त्या दूर करण्यासाठी शास्त्रज्ञांनी ०.२५ अंश बाय ०.२५ अंश इतक्या उच्च अवकाशीय विभेदन क्षमतेचा माहिती संच तयार केला आहे. यामध्ये १९५० ते २०१४ या कालावधीतील ऐतिहासिक हवामान नोंदी आणि २०१५ ते २०९९ या कालावधीतील भविष्यातील अंदाजांचा समावेश आहे. पाऊस, सरासरी तापमान, कमाल व किमान तापमान, सापेक्ष आर्द्रता, सौर प्रारण आणि वाऱ्याचा वेग अशा सात हवामान घटकांची माहिती यात उपलब्ध आहे.
माहितीतील त्रुटी दूर करण्यासाठी ‘एम्पिरिकल क्वांटाइल मॅपिंग’ (ईक्यूएम), तर भविष्यातील हवामान बदलाचे संकेत कायम ठेवण्यासाठी ‘क्वांटाइल डेल्टा मॅपिंग’ (क्यूडीएम) या पद्धती वापरण्यात आल्या आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) निरीक्षणांसह ईआरए-५ या माहिती संचाच्या आधारे प्रारूपाची पडताळणी करण्यात आली.
या प्रक्रियेमुळे पश्चिम घाट, मध्य भारत आणि ईशान्य भारतातील पावसाच्या अंदाजातील त्रुटी, तसेच हिमालयातील तापमानविषयक त्रुटी कमी झाल्या आहेत. मध्य भारतातील मान्सूनचा पाऊस आणि वार्षिक सरासरी तापमानाच्या अंदाजात नासा-नेक्स आणि आयसिमिपच्या तुलनेत अधिक अचूकता आढळली आहे. अतिवृष्टीचे दिवस आणि कमाल तापमानाच्या टोकाच्या घटनांचे चित्रही अधिक स्पष्ट झाले आहे.
Gondiya: गोंदियात पावसामुळे तीन तालुक्यात अतिवृष्टी; भातशेतीला दिलासा- शेतकरी समाधानी
विविध उत्सर्जन परिस्थितींच्या (एसएसपी १-२.६ ते एसएसपी ५-८.५) अभ्यासानुसार, कमी उत्सर्जनाच्या स्थितीत तापमानवाढ सुमारे एक अंश, तर मध्यम उत्सर्जनात दीड अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. अधिक उत्सर्जनाच्या स्थितीत ही वाढ दोन ते अडीच अंशांपर्यंत, तर सर्वाधिक उत्सर्जनात तीन अंशांपर्यंत पोहोचू शकते.
विशेष म्हणजे, रात्रीचे किमान तापमान दिवसाच्या कमाल तापमानापेक्षा अधिक वेगाने वाढणार असल्याने दिवस आणि रात्रीच्या तापमानातील तफावत कमी होण्याची शक्यता आहे. सर्व उत्सर्जन परिस्थितींमध्ये मान्सूनच्या पावसात वाढीचे संकेत असून, अधिक उत्सर्जनाच्या स्थितीत शतकाच्या उत्तरार्धात ही वाढ अधिक ठळक होऊ शकते. मात्र, पावसातील वर्षागणिक चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज आहे.
शेती, जलसंपदा व्यवस्थापन, शहरी नियोजन, आपत्ती व्यवस्थापन आणि हवामान बदलाशी जुळवून घेण्याच्या उपाययोजनांसाठी हा माहिती संच महत्त्वाचा ठरणार आहे. संशोधक आणि धोरणकर्त्यांना त्याचा वापर करता यावा, यासाठी आयआयटीएमने स्वतंत्र संकेतस्थळावर परस्परसंवादी माहिती फलक उपलब्ध करून दिला आहे.
२१०० पर्यंत भारताच्या तापमानात किती वाढ होण्याचा अंदाज आहे?
सर्वाधिक उत्सर्जनाच्या परिस्थितीत २१०० पर्यंत भारताच्या सरासरी आणि कमाल तापमानात सुमारे ३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमानात ४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याचा अंदाज आहे.
भारताच्या हवामान बदलासंदर्भातील हे निष्कर्ष कोणत्या अभ्यासातून समोर आले आहेत?
पुण्यातील भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थेने (IITM) विकसित केलेल्या ‘इंडक्लिम’ या उच्च अचूकतेच्या हवामान माहिती संचातून हे निष्कर्ष समोर आले आहेत.