जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी देवरी, अर्जुनी-मोरगाव आणि सडक-अर्जुनी या तीन तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. देवरीमध्ये ७४.०२ मिमी, अर्जुनी-मोरगावमध्ये ८७.०८ मिमी, तर सडक-अर्जुनीमध्ये ७६.०५ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ४७४ मिमी, म्हणजेच वार्षिक सरासरीच्या ९७.०३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. ८ जुलैनंतर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे वातावरणात उकाडा वाढला होता.
तालुक्यातील पावसाची नोंद
रोपवाटिका करपण्याच्या मार्गावर आल्या होत्या पावसाअभावी धानाच्या आणि शेतकऱ्यांमध्ये दुबार पेरणीची भीती निर्माण झाली होती. मात्र. वरुणराजाने पुन्हा दमदार हजेरी लावत सलग तीन दिवस संततधार सुरू ठेवल्याने खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळाली आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत जिल्ह्यात ४२०.८ मिमी पावसाची नोंद झाली असून, ती जुलै महिन्याच्या सरासरीच्या १४२.९ टक्के आहे. तर गत २४ तासात जिल्ह्यात सरासरी ४७ मिमी पाऊस झाला. बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार गोंदिया तालुक्यात २०.३ मिमी, आमगावमध्ये १७.९ मिमी, तिरोडा ३९.४ मिमी, गोरेगाव २६.८ मिमी, सालेकसा ३३.७ मिमी, देवरी
७४.२ मिमी, अर्जुनी-मोरगाव ८७.८ मिमी, तर सडक-अर्जुनीमध्ये ७६.५ मिमी पावसाची नोंद झाली. देवरी, अर्जुनी मोरगाव आणि सडक-अर्जुनी या तिन्ही तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील नागरिकांना मोठी दिलासा मिळाली आहे.
रोवणीच्या कामांना येणार वेग
सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात सुरू झालेली संततधार बुधवारीही कायम होती. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, ग्रामीण भागात पिकांसाठी हा पाऊस नवसंजीवनी ठरत आहे. विशेषतः धानपट्ट्यात रखडलेल्या भात रोवणीच्या कामांना आता वेग येण्याची शक्यता आहे. सलग पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणे, तलाव आणि इतर जलसाठ्यांमध्येही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या समाधानकारक पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पावसाअभावी निर्माण झालेली दुबार पेरणीची भीती आता दूर झाली असून, खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.






