फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केट हे नेहमीच विदेशातील ऑटो कंपन्यांना खुणावत असते. तसेच इथे व्यापाराच्या संधी अनेक असल्याकारणाने ऑटो कंपन्या बेस्ट कार्स लाँच करत असतात. तसेच काही वेळा आकर्षक ऑफर्स सुद्धा देत असतात. पण आता मार्केटमध्ये आपले वर्चस्व मिळवण्यासाठी एक नामांकित कंपनी देशात तब्बल 26 कार्स लाँच करणार आहेत. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
दक्षिण कोरियाची कार उत्पादक कंपनी Hyundai ने भारतीय मार्केटसाठी मोठ्या योजना आखल्या आहेत. भविष्यातील योजना जाहीर करताना, कंपनीने म्हटले आहे की ती आर्थिक वर्ष 30 पर्यंत भारतीय बाजारात 26 नवीन कार मॉडेल्स लाँच करणार आहे. यामध्ये 20 Internal Combustion Engine (ICE) म्हणजेच पेट्रोल-डिझेल कार आणि 6 इलेक्ट्रिक कार (EV) समाविष्ट असतील.
Tata च्या ‘या’ व्हॅनचा सगळीकडेच बोलबाला ! एक-दोन नव्हे तर 20 जणं आरामात बसतील, किंमत 7 लाख रुपये
कंपनीने असेही म्हटले आहे की भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक तीन ह्युंदाई कार्सपैकी दोन स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल्स म्हणजेच एसयूव्ही आहेत. अशा परिस्थितीत, भविष्यात ह्युंदाईचे लक्ष एसयूव्ही कारवर असेल असे मानले जाते. ह्युंदाई मोटर इंडियाचे म्हणणे आहे की कंपनीने आर्थिक वर्ष 2025 मध्ये देशांतर्गत बाजारात एकूण 5,98,666 युनिट्स कार विकल्या आहेत. ज्यामध्ये एकूण 4,10,200 युनिट्ससह एसयूव्ही वाहनांचा वाटा 68.52% होता.
26 पेट्रोल-डिझेल आणि इलेक्ट्रिक मॉडेल्स व्यतिरिक्त, ह्युंदाई भारतात हायब्रिड वाहने देखील सादर करणार आहे. सध्या, ह्युंदाईच्या भारतीय पोर्टफोलिओमध्ये ग्रँड आय10 निओस, आय20, आय20 एन लाईन, ऑरा, व्हेर्ना, एक्सटर, व्हेन्यू, व्हेन्यू एन लाईन, क्रेटा, क्रेटा एन लाईन, अल्काझर, टक्सन, क्रेटा इलेक्ट्रिक आणि आयोनिक 5 (ईव्ही) सारखे मॉडेल समाविष्ट आहेत.
मारुती सुझुकी नंतर ह्युंदाई ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी बनली आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांत टाटा मोटर्स आणि महिंद्रा यांच्यातील स्पर्धेमुळे कंपनीला थोडा तोटा झाला आहे. कदाचित यामुळेच ह्युंदाई भारतीय बाजारपेठेत आपले स्थान मजबूत करण्यासाठी नवीन मॉडेल्स लाँच करण्याची तयारी करत आहे. कारण क्रेटा, एक्सटीरियर आणि व्हेन्यू वगळता, बहुतेक मॉडेल्स बाजारात बऱ्याच काळापासून विकले जात आहेत, त्यापैकी i10, i20, ऑरा आणि व्हर्ना सारख्या कार्सना बऱ्याच काळापासून कोणतेही मोठे अपडेट मिळालेले नाहीत.