होंडा कंपनी भारतीय बाजारपेठेसाठी आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक एसयूव्हीवर वेगाने काम करत आहे. नुकतेच मनालीमध्ये चाचणी दरम्यान या कारचे नवीन मॉडेल पुन्हा एकदा कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ही नवीन ईव्ही कंपनीच्या ‘० अल्फा’ संकल्पनेवर आधारित आहे. भारतात २०२७ मध्ये ही इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉन्च करण्याचे कंपनीचे नियोजन आहे.
समोर आलेल्या फोटोंनुसार, या कारच्या केबिनमध्ये डॅशबोर्डच्या मध्यभागी एक खूप मोठी ‘फ्रीस्टँडिंग टचस्क्रीन’ देण्यात आली आहे. ही स्क्रीन होंडाच्या सध्याच्या भारतीय गाड्यांपेक्षा बरीच मोठी आणि रुंद आहे. याशिवाय, ड्रायव्हरसाठी स्टिअरिंग व्हीलच्या मागे एक स्वतंत्र डिजिटल डिस्प्ले देखील दिसत आहे. कारचे डॅशबोर्ड डिझाईन स्लिम एसी व्हेंट्ससह अगदी आधुनिक आणि स्वच्छ ठेवण्यात आले आहे. कारचे स्टिअरिंग व्हील देखील पूर्णपणे नवीन डिझाइनचे आहे.
या ईव्हीचा मागील भाग बॉक्ससारखा आणि उभा आहे. यात टेलगेट अगदी सरळ असून, त्यावर उभ्या आकाराचे एलईडी टेललॅम्प्स दिले आहेत. कारच्या समोरील बाजूस स्लीक बंद ग्रिल आणि चौकोनी एलईडी लाईट्स देण्यात आले आहेत. कारचा बोनेट भाग लहान आहे, ज्यामुळे केबिनसाठी अधिक जागा उपलब्ध होणार आहे. होंडाच्या “थिन, लाईट अँड वाईज” या जागतिक तत्त्वावर ही कार डिझाइन करण्यात आली आहे.
रिपोर्ट्सनुसार, भारतासाठी तयार होणाऱ्या या मॉडेलमध्ये ६० किलोवॉट अवर ते ७० किलोवॉट अवर क्षमतेचा बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो, जो एका चार्जमध्ये सुमारे ४५० किलोमीटरची प्रॅक्टिकल रेंज देईल. सुरुवातीला ही कार सिंगल-मोटर, फ्रंट-व्हील-ड्राइव्ह सेटअपसह बाजारात येऊ शकते. या गाडीचे उत्पादन राजस्थानमधील होंडाच्या ‘टपुकरा’ प्लांटमध्ये स्थानिक पातळीवर केले जाण्याची दाट शक्यता आहे.
भारतीय बाजारपेठेत सध्या होंडाची पकड अमेझ, सिटी आणि एलिव्हेट या गाड्यांवर आहे. ही नवीन इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये आल्यानंतर तिची थेट स्पर्धा हुंडाई क्रेटा इलेक्ट्रिक, मारुती सुझुकी ई-विटारा आणि टाटा कर्व्ह ईव्ही यांसारख्या गाड्यांशी होईल. ही कार होंडाला भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात एक मजबूत स्थान मिळवून देण्यास मदत करेल.






