फोटो सौजन्य: iStock
आपली स्वतःची कार असावी हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हेच स्वप्न साकार करण्यासाठी अनेक जण दिवसरात्र मेहनत करत असतात. पण अनेकदा अशा काही घटना घडतात, ज्यामुळे कार खरेदीदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
हल्ली नवीन कारच्या नावाने जुन्या कार विकण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेक कार डीलर्स ग्राहकांना फसवत असतात आणि नंतर तिथून पलायन करतात. अशा घटनांमुळे कार खरेदीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच अशीच एक घटना कर्नाटकात घडली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
Nissan Magnite खरेदी करण्यासाठी किती करावे लागेल Down Payment? ‘एवढा’ असेल EMI?
अलीकडेच, कर्नाटकात टाटा मोटर्सच्या एका डीलरशिपने अपघात झालेल्या नेक्सॉन एसयूव्हीला नवीन कार म्हणून एका ग्राहकाला विकले. जेव्हा ग्राहकाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले तेव्हा त्याने ग्राहक न्यायालयात धाव घेतली. यावेळी न्यायालयाने डिलरशिपला खडसावले असून त्यांना आता 18 लाख रुपये परत करण्याचे आदेश दिले आहेत. चला याबद्दल जाणून घेऊया.
ही घटना बेंगळुरू येथे घडली आहे, जिथे एका डॉक्टरने कनकपुरा येथील टाटा मोटर्स डीलरशिपमधून टाटा नेक्सॉन एसयूव्ही खरेदी केली होती. गाडीची डिलिव्हरी घेताना त्याने ती नीट तपासली नाही. पण, काही दिवसांनी, गाडीत अनेक समस्या दिसू लागल्या, ज्या खाली नमूद केल्या आहेत.
जेव्हा हा ग्राहक कार घेऊन लांबच्या प्रवासाला गेला तेव्हा त्याला यामध्ये आणखी समस्या लक्षात येऊ लागल्या. या एसयूव्हीचा एसी पाईप खराब झाला होता आणि व्हेंट्समधून फक्त गरम हवा बाहेर येत होती. याशिवाय, इंजिनजवळ कोणतेही इन्सुलेशन नव्हते, त्यामुळे केबिनमध्ये पेट्रोलचा वास येत होता. तसेच, कारच्या दरवाजाचे सेन्सर व्यवस्थित काम करत नव्हते आणि कारने वेग पकडताच ती आपोआप अनलॉक होत होती.
TVS Jupiter की Honda Activa, इंजिन, फीचर्स आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत कोणती स्कूटर आहे बेस्ट?
कारमधील खराबी दिसल्यानंतर ग्राहकाने ताबडतोब डीलरशिपशी संपर्क साधला आणि या सर्व समस्या सोडवण्याची विनंती केली. पण, डीलरशिपने त्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले. जेव्हा ग्राहकाने टाटा मोटर्सच्या अधिकाऱ्यांना ईमेल पाठवले तेव्हा त्यांनीही त्याला प्रतिसाद दिला नाही.
कुठूनही मदत न मिळाल्याने या ग्राहकाने शेवटी ग्राहक न्यायालयात धाव घेतली. या कारचे एका स्वतंत्र गॅरेजमध्ये तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये असे आढळून आले की या कारचा एक मोठा अपघात झाला होता ज्यात या कारचे मोठे नुकसान झाले होते. हीच कार दुरुस्त करून डिलरशिपने ती ग्राहकाला नवीन कार म्हणून विकली. यानंतर, न्यायालयाने या फसवणुकीला गांभीर्याने घेतले आणि डीलरशिपला 18 लाख रुपये ग्राहकाला परत करण्याचे आणि कार पूर्णपणे दुरुस्त करण्याचे आदेश दिले.