भारतात ‘ट्रायम्फ बॉनेव्हिल ४००’ ही क्लासिक बाईक पुन्हा एकदा टेस्टिंगदरम्यान रस्त्यांवर धावताना स्पॉट झाली आहे. समोर आलेल्या नवीन स्पाय फोटोंवरून असे दिसते की, ही बाईक आता प्रोडक्शनसाठी पूर्णपणे तयार आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही बाईक सतत टेस्टिंगदरम्यान दिसत असल्याने, चालू वर्ष २०२६ च्या शेवटापर्यंत ही भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे लाँच केली जाऊ शकते.
क्लासिक आणि रेट्रो डिझाईन
नवीन बॉनेव्हिल ४०० चे डिझाईन ट्रायम्फच्या सध्याच्या ‘स्पीड ४००’ किंवा ‘स्क्रॅम्बलर ४०० एक्स’ पेक्षा खूप वेगळे आहे. या बाईकच्या मागील भागात मोनोशॉकऐवजी ‘ट्विन रिअर शॉक ॲब्जॉर्बर्स’ (दोन सस्पेन्शन) देण्यात आले आहेत, जे तिला अस्सल विंटेज लुक देतात. याशिवाय गोल रिअर फेंडर, गोल टेल लॅम्प, लांब एकसंध सीट आणि काळ्या रंगाचा ‘पीशूटर एक्झॉस्ट’ (सायलेन्सर) बाईकच्या जुन्या काळातील रेट्रो स्टाईलला अधिक मजबूत करतो.
वैशिष्ट्ये आणि सस्पेन्शन
या टेस्ट मॉडेलमध्ये वायर-स्पोक व्हील्स (तारांचे व्हील्स) आणि रस्त्यासाठी योग्य असणारे टायर्स पाहायला मिळाले आहेत. बाईकच्या पुढच्या भागात रबर गेटर्ससह पारंपरिक टेलिस्कोपिक फोर्क्स सस्पेन्शन देण्यात आले आहे. आरामदायी प्रवासासाठी यात रुंद हँडलबार, गोल आरसे आणि सरळ बसण्याची पोझिशन दिली आहे. यात गोल इन्स्ट्रुमेंट कन्सोल असून, टॉप व्हेरियंटमध्ये मोठी स्क्रीन मिळण्याची शक्यता आहे.
या बाईकची इंधन टाकी ट्रायम्फच्या सध्याच्या ४०० सीसी मॉडेल्समधील १३-लिटरच्या टाकीपेक्षा मोठी दिसते. मोठी टाकी आणि लांब सीटमुळे ही बाईक रोजच्या वापरासोबतच लांबच्या प्रवासासाठी उत्तम पर्याय ठरेल.
दरवाढी करण्यात आता Triumph ची देखील उडी! ‘इतक्या’ रुपयांनी वाढवू शकते Bikes ची किंमत
इंजिन आणि किंमत
अंदाजानुसार, या बॉनेव्हिल बाईकमध्ये ३५० सीसी ते ४०० सीसी क्षमतेचे लिक्विड-कोल्ड इंजिन असू शकते, जे ६-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले असेल. सुरक्षेसाठी यात स्लिपर क्लच, राईड-बाय-वायर थ्रॉटल आणि ड्युअल-चॅनल यांसारखे फीचर्स मिळतील. ट्रायम्फ ही बाईक दोन व्हेरियंट्समध्ये आणू शकते—एक क्रोम फिनिश आणि स्पोक व्हील्ससह क्लासिक व्हेरियंट, तर दुसरा अलॉय व्हील्ससह डार्क थीम व्हेरियंट.
लाँच झाल्यानंतर, ट्रायम्फ बॉनेव्हिल ४०० ही भारतीय बाजारात थेट रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५०, जावा, येझ्दी ३५० आणि होंडा या गाड्यांना तगडी टक्कर देईल. बाईकप्रेमींसाठी हा एक किफायतशीर आणि प्रीमियम पर्याय ठरू शकतो.






