फोटो सौजन्य: @AckoDrive/ X.com
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये नवा अध्याय सुरू करत इंडिया यामाहा मोटरने एकाच वेळी चार नवीन वाहनं लाँच केले. यात रेट्रो स्टाइल XSR155 बाईक, तरुणांसाठी स्पोर्टी FZ-RAVE, तसेच कंपनीच्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स AEROX-E आणि EC-06 चा समावेश आहे.
या लाँचेसद्वारे यामाहाने प्रीमियम बाईक आणि ईव्ही विभागात आपले नेतृत्व मजबूत करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामाहाचे ग्लोबल प्रेसिडेंट इतरू ओतानी यांनी सांगितले की, “भारत हा आमच्या जागतिक धोरणातील अत्यंत महत्त्वाचा बाजार आहे. या नवीन मॉडेल्समुळे आम्ही कार्यक्षमता, डिझाइन आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत नव्या उंचीवर पोहोचणार आहोत.”
नवीन XSR155 ही यामाहाच्या जागतिक XSR सिरीजची भारतीय आवृत्ती असून याची किंमत 1,49,990 (एक्स-शोरूम, दिल्ली) ठेवण्यात आली आहे. या बाईकमध्ये 155 सीसी लिक्विड-कूल्ड, 4-व्हॉल्व्ह VVA इंजिन असून ते 13.5 kW पॉवर आणि 14.2 Nm टॉर्क निर्माण करते. यात ड्युअल-चॅनेल ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, ॲल्युमिनियम स्विंग आर्म आणि अपसाइड-डाऊन फ्रंट फोर्क्स देण्यात आले आहेत. XSR155 चार रंगांमध्ये उपलब्ध आहे – मेटॅलिक ग्रे, विविड रेड, ग्रीन मेटॅलिक आणि मेटॅलिक ब्ल्यू, तसेच स्क्रॅम्बलर आणि कॅफे रेसर अशा दोन ॲक्सेसरी पॅकेजसह.
यामाहाने 2 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करत भारताच्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात आपले पहिले पाऊल ठेवले आहे. AEROX-E Performance EV मध्ये 9.4 kW इलेक्ट्रिक मोटर, 48 Nm टॉर्क आणि ड्युअल 3 kWh डिटेचेबल बॅटरीज देण्यात आल्या आहेत. या स्कूटरची प्रमाणित रेंज 106 किमी असून ती इको, स्टँडर्ड, पॉवर आणि बूस्ट अशा चार मोड्ससह येते. टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसह मोठी TFT डिस्प्ले स्क्रीन, Y-कनेक्ट ॲप कनेक्टिव्हिटी आणि रिव्हर्स मोड हे याचे खास आकर्षण आहे.
दुसरीकडे, EC-06 इलेक्ट्रिक स्कूटर ही शहरी प्रवाशांसाठी डिझाइन केली गेली असून ती 4.5 kW मोटर आणि 4 kWh फिक्स्ड बॅटरीवर चालते. ही स्कूटर 160 किमी रेंज, फ्रंट-रियर डिस्क ब्रेक्स, LED लाइटिंग, कलर LCD डिस्प्ले आणि टेलिमॅटिक्स SIM कनेक्टिव्हिटीसह येते.
दोन्ही स्कूटर्स यामाहाच्या “Heart-Shaking Speedster” डिझाइन फिलॉसॉफीला अनुसरतात, ज्यात परफॉर्मन्स आणि स्टाइलचे कॉम्बिनेशन आहे.
FZ सिरीजच्या वारशाला पुढे नेत नवीन FZ-RAVE भारतीय तरुणांसाठी खास डिझाइन केली गेली आहे.
याची किंमत 1,17,218 (एक्स-शोरूम, दिल्ली) ठेवण्यात आली आहे. या बाईकमध्ये 149 सीसी एअर-कूल्ड इंजिन (9.1 kW पॉवर), सिंगल-चॅनेल ABS, आणि फ्रंट-रियर डिस्क ब्रेक्स आहेत. ती मॅट टायटन आणि मेटॅलिक ब्लॅक अशा दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.






