(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
राज्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला वेग आला असून आतापर्यंत १ कोटी १४ लाख ४४ हजार ७६३ स्मार्ट मीटर कार्यान्वित करण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील ४७.३१ टक्के वीज ग्राहक स्मार्ट मीटरिंग यंत्रणेशी जोडले गेले आहेत. सर्वाधिक ४३ लाख ३ हजार ३०३ स्मार्ट मीटर बसवून कोकण विभागाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या मोहिमेचं नेमकं काय आहे महत्त्व जाणून घेऊयात.
महावितरणच्या माहितीनुसार, ग्राहकांना अचूक बिलिंग, वीज वापरावर नियंत्रण आणि ‘टाइम ऑफ डे’ (टीओडी) सवलतीचा लाभ मिळावा यासाठी स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. ही मीटरे ग्राहकांना कोणतेही शुल्क न आकारता बसवून दिली जात आहेत.
स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना दर तासाला त्यांच्या मोबाईलवरील अॅपच्या माध्यमातून घरातील किंवा कार्यालयातील वीज वापराची माहिती मिळते. त्यामुळे वीज वापराचे नियोजन करणे सोपे होत असून अनावश्यक वापर टाळण्यास मदत होत आहे. तसेच वीज वितरण व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्याबरोबरच वीजगळती रोखण्यातही या यंत्रणेची महत्त्वाची भूमिका असल्याचे महावितरणने म्हटले आहे.
विजेचा वापर कोणत्या वेळेला झाला? त्यानुसार वीजदरात सवलत देण्याला टाईम ऑफ डे (टीओडी) सवलत
म्हणतात. स्मार्ट मीटरमध्ये अशा प्रकारे वेळेनुसार वीजवापर मोजण्याची सुविधा आहे. ग्राहकांनाही त्यांच्या मोबाईल फोनमधील अॅपमध्ये दर तासाला घरात अथवा कार्यालयात किती वीज वापर होत आहे, हे समजते. स्मार्ट मीटरमुळे घरगुती ग्राहकांनाही टीओडी सवलत सुरू केली आहे.
स्मार्ट मीटर बसविलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसाच्या ठरावीक कालावधीत झालेल्या वीज वापरावर प्रति युनिट ८० पैशांपर्यंत टीओडी सवलत दिली जात आहे. याशिवाय औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांनाही सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत होणाऱ्या वीज वापरासाठी वीजदरात सवलतीचा लाभ मिळत आहे.
महावितरणच्या म्हणण्यानुसार, स्मार्ट मीटरमुळे अचूक बिलिंग, वीज वापरावरील नियंत्रण आणि सवलतीच्या दरांचा लाभ मिळत असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे.
“स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना अचूक बिलिंग, वीज वापराचे रिअल-टाइम निरीक्षण आणि ‘टाइम ऑफ डे’ (टीओडी) सवलतीचा लाभ मिळत आहे. स्मार्ट मीटर बसविलेल्या घरगुती ग्राहकांना प्रति युनिट ८० पैशांपर्यंत सवलत मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद वाढत असून राज्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला चांगला वेग मिळाला आहे”, असं विधान महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी केलं आहे.
चौकट:
कोणत्या भागात किती स्मार्ट मीटर :
छ. संभाजीनगर झोन. ४,८१,२६१
लातूर झोन. ५,०६,६७५
नांदेड झोन. ३,५३,५८०
छ. संभाजीनगर विभाग. ,४१,५१६
भांडूप झोन. १०,४०,३६५
जळगाव झोन. ६,५९,५६७
कल्याण झोन. १४,८६,३२२
रत्नागिरी झोन. ३,२८,५६९
नाशिक झोन. ७,८८,४८०
कोकण विभाग. ४३,०३,३०३
अकोला झोन. ४,०६,९०९
अमरावती झोन. ४,०७,३९४
चंद्रपूर झोन. ३,७५,७७२
गोंदिया झोन. ३,३२,५७५
नागपूर झोन. ७,२२,७१६
नागपूर विभाग. २२,४५,३६६
बारामती झोन. १०,२२,७११
कोल्हापूर झोन. ११,५७,०९५
पुणे झोन. १३,७४,७७२
पुणे विभाग. ३५,५४,५७८






