एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय १४ वी भारतीय छात्र संसद ८ ते १० फेब्रुवारी २०२५ या कालावधीत कोथरूड येथील विवेकानंद सभामंडपात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून उत्तर प्रदेश विधानसभेचे सभापती सतीश महाना यांना आदर्श विधानसभा सभापती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या छात्र संसदेमध्ये विविध राष्ट्रीय नेते, विचारवंत आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष प्रा. राम शिंदे, राजस्थान विधान परिषदेचे माजी सभापती डॉ. सी.पी. जोशी आणि बीओएटी कंपनीचे सहसंस्थापक अमन गुप्ता उपस्थित राहतील.
पहिल्या दिवशी ‘भारतीय राजकारणाची विचारधारा – डावीकडे, उजवीकडे की नजरेच्या बाहेर?’ या विषयावर सत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चेत हिमाचल प्रदेश विधानसभेचे सभापती कुलदीपसिंह पठानिया, एनएसयूसीचे प्रमुख डॉ. कन्हैया कुमार, माजी खासदार अॅड. ए.ए. रहिम आणि खासदार राजकुमार रौत विचार मांडतील. दुसऱ्या दिवशी ‘रेवडी संस्कृती: आर्थिक भार की आवश्यक आधार?’ या विषयावर चर्चासत्र होईल. यामध्ये झारखंड विधानसभेचे सभापती रवींद्रनाथ महातो, प्रसिद्ध टीव्ही पत्रकार रुबिका लियाकत, काँग्रेस नेते पवन खेरा, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ आणि माजी मंत्री नवज्योत सिंग सिद्धू आपली मते मांडणार आहेत.
तिसऱ्या दिवशी ‘भारतीय संस्कृती की पाश्चात्य ग्लॅमर?’ या विषयावर चर्चा होणार असून सिव्हिल एव्हिएशन मंत्री राम मोहन नायडू यांना भारत अस्मिता जनप्रतिनिधी श्रेष्ठ पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. अभिनेत्री खुशबू सुंदर व लोकसभा सदस्य अरुण गोविल हे देखील या चर्चेत सहभागी होतील. कार्यक्रमाचा समारोप १० फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या तीन दिवसांत विद्यार्थ्यांना ‘युथ टू युथ कनेक्ट’ सत्र तसेच आमदारांसाठी ‘नेतृत्व क्षमता संवर्धन कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात देशभरातील २५० हून अधिक आमदार सहभागी होणार असून ते विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.