फोटो सौजन्य- सोशल मीडिया
High Paying Jobs Without Degree: आजकाल भारतीय जॉब मार्केटमध्ये एक मोठा बदल पाहायला मिळत आहे, जिथे कंपन्यांचे लक्ष पदवीपेक्षा (Degree) प्रॅक्टिकल स्किल्सवर (Practical Skills) अधिक केंद्रित होत आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या (TOI) एका रिपोर्टनुसार, भारतात काम करणाऱ्या जवळपास ८५ टक्के प्रौढांकडे पदवी नाही. गुगल (Google) आणि आयबीएम (IBM) सारख्या मोठ्या कंपन्या देखील आता नोकरीसाठी पदवीची अनिवार्यता संपवत आहेत. जर तुम्हाला १२ वी नंतर कॉलेजला न जाता एखाद्या कल्पक (Creative) क्षेत्रात नाव कमवायचे असेल, तर तुम्ही या ३ मार्गाचा नक्की वापर करू शकता.
आकाश गाठण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी कमर्शियल पायलटचे करिअर हे सर्वात आकर्षक आहे. या क्षेत्रात सरासरी वार्षिक पगार ₹२४,००,००० पर्यंत असू शकतो. यासाठी कोणत्याही कॉलेजच्या पदवीची गरज नसते, तर १२ वी (सायन्स स्ट्रीम) नंतर डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) कडून मान्यताप्राप्त कमर्शियल पायलट लायसन्स (CPL) मिळवणे आवश्यक असते. भारतात सध्या पायलटची मोठी टंचाई असल्याने या क्षेत्रातील भविष्यातील संधी उत्तम आहेत. जसा अनुभव वाढतो, तसा सीनियर कॅप्टनचा वार्षिक पगार ₹१.२ कोटी ते ₹१.८ कोटी किंवा त्याहूनही अधिक होऊ शकतो.
ज्यांना नवीन ठिकाणी फिरण्याची आवड आहे आणि हॉटेल्स व पर्यटन स्थळांची चांगली समज आहे, ते ट्रॅव्हल कन्सल्टंट म्हणून यशस्वी करिअर करू शकतात. या व्यवसायात तुमची संवाद कौशल्ये आणि नेटवर्किंग हीच तुमची सर्वात मोठी पदवी असते. आजच्या काळात ट्रॅव्हल एजंट केवळ तिकीट बुकिंगच करत नाहीत, तर ट्रॅव्हल पॅकेज, व्हिसा साहाय्य आणि विम्याच्या माध्यमातून ५% ते २५% पर्यंत कमिशन मिळवतात. तुमचे क्लायंट जसे वाढतील, तशी तुमची महिन्याची कमाई लाखांच्या घरात पोहोचू शकते.
ग्लॅमर, चित्रपटसृष्टी आणि लग्नकार्यांची वाढती क्रेझ यामुळे मेकअप आर्टिस्टची मागणी प्रचंड वाढली आहे. हे पूर्णपणे कल्पकता आणि कौशल्यावार आधारित काम आहे, ज्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या स्किन टोन्स आणि लेटेस्ट ब्युटी ट्रेंड्सची माहिती असणे आवश्यक आहे. भारतात एक अनुभवी किंवा सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट दरमहा ₹१,००,००० ते ₹५,००,००० पर्यंत सहज कमवू शकतो. फ्रीलांसिंगच्या (Freelancing) माध्यमातून तुम्ही एका क्लायंटकडून ₹३०,००० ते ₹१,००,००० पर्यंत फी आकारू शकता.
थोडक्यात सांगायचे तर, आजचे युग हे केवळ पदवीचे नसून हुशार आणि कुशल हातांचे आहे. जर तुमच्याकडे योग्य कौशल्य आणि काम करण्याची जिद्द असेल, तर पदवीशिवायही तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठू शकता.






