Supreme Court Metro Station: 'जर सर्वोच्च न्यायालय मेट्रो स्टेशन दुपारपर्यंत उघडले नाही तर...': सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे SCBA ला आश्वासन
Supreme Court Metro Station: दिल्लीतील जंतरमंतरवर बुधवारी रात्री विद्यार्थी आणि दिल्ली पोलिसांमध्ये मोठा संघर्ष झाला. रात्री उशिरापर्यंत हा संघर्ष सुरू होता. या संघर्षानंतरही देशभरातून जंतरमंतरवर येणाऱ्यांचा ओघ वाढतच चालला आहे. या घटनेनंतर दिल्ली मेट्रो प्रशासनाकडून आज (२३ जुलै) १६ स्थानके बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. यावरून दिल्लीतील वकिलांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेत मेट्रो स्टेशन सुरू करण्याची याचिका दाखल केली आहे.
NEET पेपरफुटीविरोधातील आंदोलनामुळे जंतर-मंतर परिसरातील अनेक दिल्ली मेट्रो स्थानके बंद ठेवण्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचा मुद्दा गुरुवारी न्यायालयात उपस्थित करण्यात आला. यावर सरन्यायाधीशांनी (CJI) दुपारपर्यंत स्थानके सुरू न झाल्यास न्यायालय हस्तक्षेप करेल, असे स्पष्ट केले. या याचिकेवर सुनावणी घेताना भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी, मेट्रो स्टेशनचे दरवाजे दुपारपर्यंत किंवा जेवणाच्या वेळेपर्यंत उघडले नाहीत, तर सर्वोच्च न्यायालय स्वत: हस्तक्षेप करेल.” असे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या विनंतीवरून त्यांनी हे आश्वासन दिले आहे.
बार अँड बेंचच्या वृत्तानुसार, सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांनी न्यायालयात सांगितले की, जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनामुळे परिसरातील अनेक मेट्रो स्थानके बंद असल्याने वकील आणि न्यायालयीन कर्मचारी अडचणीत आले आहेत. स्थानके बंद करण्याऐवजी वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांची मेट्रो स्थानकांवरच तपासणी करून त्यांना प्रवासाची परवानगी द्यावी, अशी त्यांनी सूचना केली.
विकास सिंह म्हणाले, “मेट्रोमध्ये वकील किंवा न्यायालयीन नोंदणी विभागातील कर्मचाऱ्यांची तपासणी करता येऊ शकते. मात्र स्थानके बंद ठेवल्यामुळे आम्हाला मोठा फटका बसत आहे.” यावर सरन्यायाधीशांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “दुपारपर्यंत स्थानके सुरू करण्याबाबत काहीच हालचाल झाली नाही, तर आम्ही या प्रकरणात हस्तक्षेप करू.”
तसेच, आंदोलनामुळे वकील न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत, तर त्यांच्या अनुपस्थितीमुळे कोणताही प्रतिकूल आदेश देऊ नये, असे निर्देश सर्व न्यायाधीशांना दिल्याचेही सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले. विकास सिंह यांनी या प्रकरणात न्यायालयीन हस्तक्षेपाची आवश्यकता भासू शकते, असे म्हटल्यावर सरन्यायाधीशांनी, “होय, दुपारपर्यंत मेट्रो स्थानके सुरू झाली नाहीत, तर आम्ही हा विषय पाहू,” असे आश्वासन दिले.
दरम्यान, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने गुरुवारी 16 मेट्रो स्थानके तात्पुरती बंद ठेवण्याची घोषणा केली. यामध्ये बाराखंबा रोड, केंद्रीय सचिवालय, दिल्ली गेट, इंद्रप्रस्थ, आयटीओ, जनपथ, जोर बाग, खान मार्केट, लोक कल्याण मार्ग, मंडी हाऊस, पटेल चौक, राजीव चौक, रामकृष्ण आश्रम मार्ग, सेवा तीर्थ, शिवाजी स्टेडियम आणि सुप्रीम कोर्ट या स्थानकांचा समावेश आहे. DMRC ने प्रवाशांना प्रवास सुरू करण्यापूर्वी आपल्या मार्गाची माहिती तपासून आवश्यक असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.






