फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Zp & Corporation School News: आपल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली वर्गाच्या पटसंख्येला गेल्या चार वर्षांपासून उतरती कळा लागली आहे. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८ लाख १५ हजार इतकी होती. ती २०२५-२६ मध्ये ६ लाख ७७ हजार ३९९ वर घसरली आहे. परिणामी, अवघ्या चार वर्षांत तब्बल १ लाख ३७ हजार ६०६ विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे.
‘यूडायस प्लस’च्या आकडेवारीनुसार पहिलीत प्रवेश घेणााऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी कमी होत आहे. २०२२-२३ ते २०२३-२४ या एका वर्षात ६९ हजार ३६६ विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. त्यानंतर २०२४-२५ आणखी ४६ हजार ९४६ कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे तर ही घट आता २०२५-२६ मध्ये ही दिसून येत असून मागील दोन वर्षांच्या तुलनेत विद्यार्थी कमी होण्याचा वेग काहीसा मंदावल्याचे दिसून येते आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शिष्यवृत्ती, डिजिटल सुविधा असे अनेक उपक्रम राबवूनही अजूनही पटसंख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. याचे मुख्य कारण हे पालकांचा आपल्या मुलांना खाजगी शाळेत घालण्याचा अट्टाहास, स्थलांतर आणि घटता जन्मदर हे असल्याचे जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, आगामी शैक्षणिक वर्षात पहिलीची पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षण विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना विशेष मोहीमा राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळांच्या परिसरातील अंगणवाडी तसेच बालवालड्यांना भेटी देणे, प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची यादी तयार करणे, पालकांशी थेट संपर्क साधणे किंवा शाळांमधील सुविधा व उपक्रमांची माहिती पोहचवणे यावर भर देण्यात आला आहे. तसेच नाविण्यपूर्ण जाहिराती आणि सोशल मीडियाद्वारे प्रसिद्धी मिळवून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु, तरीही गेल्या काही वर्षात जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या शाळांमध्ये कोट्यावधींचा निधी खर्च करूनही विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे चित्र केंद्र सरकारच्या अहवालातून समोर आले आहे.






