फोटो सौजन्य- सोशल मीडिया
National Teachers Award 2026: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ साठीची अधिकृत अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रतिष्ठित पुरस्काराच्या माध्यमातून देशभरातील अशा शिक्षकांचा गौरव केला जातो, ज्यांनी अध्यापन, संशोधन (रिसर्च), नवोपक्रम, विद्यार्थी मार्गदर्शन आणि संस्थात्मक विकास या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. विद्यापीठे, महाविद्यालये, उच्च शिक्षण संस्था आणि पॉलिटेक्निक्समध्ये कार्यरत असलेले शिक्षक ५ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
या पुरस्काराची प्रमुख दोन भागात विभागणी केली आहे.
पहिला भाग: हा उच्च शिक्षण संस्थांमधील (Higher Educational Institutions) शिक्षकांसाठी आहे. यामध्ये तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वास्तुकला, विज्ञान, कला, सामाजिक विज्ञान, मानवविद्या, भाषा, कायदा, वाणिज्य आणि व्यवस्थापन यांसारख्या विषयांचा समावेश आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, उद्योन्मुख नवीन ज्ञान क्षेत्रांचाही यात समावेश केला जाऊ शकतो.
दुसरा भाग: यामध्ये देशभरातील पॉलिटेक्निक संस्थामध्ये कार्यरत शिक्षक आणि फॅकल्टी सदस्यांचा समावेश होतो. याअंतर्गत तांत्रिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना सन्मानित केले जाईल.
या पुरस्कारासाठी इच्छुक शिक्षकांनी सर्वप्रथम राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर (National Awards Portal) जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे. नोंदणी केल्यानंतर लॉगिन करून अर्ज करावा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. सर्व माहिती अचूक भरल्यानंतर अर्ज सबमिट करावा.






