फोटो सौजन्य - सोशल मीडिया
नेव्हल आर्किटेक्टचे काम हे जहाज आणि सागरी संरचनांच्या डिजाइन व बांधकामाशी संबंधित आहे. जहाजाचा आकार वजन, त्याची क्षमता तसेच जहाज पाण्यात कसे चालेल ते किती स्थिर राहील यांकडे लक्ष देण्याचे काम नेव्हल आर्किटेक्ट करतो. याशिवाय इंधनाचा वापर आणि पर्यावरणावर होणारा परिणाम याचा विचार करून जहाज आंतरराष्ट्रीय सुरक्षा नियमांनुसार बनवलेले आहे की नाही याची खात्री ते करतात. हे काम अत्यंत जबाबदारीचे असल्यांने यात झालेली छोटी चूक कोट्यावधीचे नुकसान करु शकते.
या क्षेत्रात काम करणारे लोक जहाज बांधणी कंपन्या, डिझाइन ऑफिसेस, सरकारी विभाग आणि संशोधन संस्थांमध्ये काम करतात. काही लोक जहाज तयार करण्याच्या विभागात काम करतात. अनेकदा त्यांना वेगवेगळ्या देशात जाऊन प्रकल्पावर काम करावे लागते. काही लोक ऑफिसमध्ये कॉप्युटरवर डिजाइन बनवतात तर काही प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी बांधकामावर देखरेख करतात. अशा प्रकारे ही नोकरी ऑफिस आणि फिल्ड अशा दोन्ही कामांची संधी देते.
नेव्हल आर्किटेक्ट बनण्यासाठी अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यावे लागते. साधारणपणे विद्यार्थी मरीन इंजिनीअरिंग किंवा नेव्हल आर्किटेक्चर (Naval architect) मध्ये पदवी घेतात. काही लोक मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगनंतरही या क्षेत्रात प्रवेश करतात. या व्यवसायाकरिता गणित, भौतिकशास्त्र आणि डिझाइनची उत्तम समज असणे आवश्यक आहे. कॉम्प्युटर सॉफ्टवेअरचेही ज्ञान असणे महत्त्वाचे आहे.
या व्यवसायात तांत्रिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभवाची गरज असते. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष काम समजून घेण्याकरिता इंटर्नशिप आणि ट्रेनिंग घेणे आवश्यक आहे. अनुभवानुसार या क्षेत्रात चांगल्या संधी आणि जबाबदारी मिळतात. हे लोक सीनियर डिझायन इंजिनीअर, प्रोजेक्ट मॅनेजर, संशोधन किंवा विकास क्षेत्रात जाऊ शकतात. तसेच पगाराबाबत सांगायचे झाल्यास वार्षिक ८ लाखांपर्यंत पॅकेज मिळते जे अनुभवानुसार ४० लाखांपर्यंत जाऊ शकते.
आजच्या काळात नेव्हल आर्किटेक्टचे काम अधिक महत्त्वाचे आहे, कारण सागरी व्यापार आणि जहाजांची मागणी वाढत आहे. तसेच पर्यावरण रक्षण आणि इंधन बचतीवर भर दिला जात आहे. त्यामुळे अत्याधुनिक जहाजे बनवली जात असल्याने नेव्हल आर्किटेक्टची भूमिका महत्वाची आहे.






