फोटो सौजन्य- सोशल मीडिया
NEET UG 2026 Re-Exam: च्या फेरपरीक्षेला बसणाऱ्या उमेद्वारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) २१ जून २०२६ रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी सिटी इंटिमेशन स्लिप जाहीर केली आहे. त्यामुळे आता नोंदणीकृत उमेदवार अधिकृत पोर्टलवर जाऊन त्यांचे परीक्षा शहर तपासू शकतात. यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे लागेल.
ही स्लिप विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षा केंद्र कोणत्या शहरात असेल याची आगाऊ माहिती देते. जेणेकरून ते प्रवासाची आणि इतर आवश्यक व्यवस्था वेळेत करू शकतील.
उमेदवार NTA च्या अधिकृत NEET UG वेबसाइटला भेट देऊन सहजपणे सीटी इंटिमेशन स्लिप “City Intimation Slip” डाऊनलोड करू शकतात. उमेदवार हवे असल्यास याची प्रिंट आउट काढू शकतात. परीक्षेपूर्वी कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये म्हणून सर्व उमेदवारांनी वेळेत आपले परीक्षा शहर तपासून घ्यावे, असा सल्ला NTA ने दिला आहे.
NTA ने दिलेल्या माहितीनुसार, NEET UG 2026 री-एग्जाम २१ जून २०२६ रोजी दुपारी २:०० ते संध्याकाळी ५:१५ या वेळेत आयोजित केली जाईल. ही परीक्षा ‘पेन-अँड-पेपर’ (ऑफलाइन) पद्धतीने होणार आहे. या परीक्षेसाठी देशभरातील ५५१ शहरांमध्ये आणि परदेशातील १४ शहरांमध्ये परीक्षा केंद्रे उभारण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षार्थींना परीक्षेच्या दिवशी केंद्रावर वेळेत पोहचावे लागेल. तसेच लवकरच NTA कडून अॅडमिट कार्ड जारी केले जाईल. त्यामुळे उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर नियमित लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अनेक उमेदवार ‘सिटी इंटिमेशन स्लिप’लाच अॅडमिट कार्ड समजतात. परंतु, या दोन्हीत फरक आहे. सिटी स्लिप केवळ परीक्षा कोणत्या शहरात आहे, याची माहिती देते तर अॅडमिट कार्डवर परीक्षा केंद्राचा संपूर्ण पत्ता, रिपोर्टिंग टाईम, परिक्षेचे नियम आणि उमेदवाराची वैयक्तिक महिती असते. त्यामुळे उमेदवारांना हे माहिती असणे आवश्यक आहे की, सिटी स्लिपच्या आधारे परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेस बसण्यासाठी उमेदवाराकडे अॅडमिट कार्ड असणे आवश्यक आहे.






