फोटो सौजन्य- सोशल मीडिया
NEET OMR Sheet Glitch: नॅशनल टेस्टिंग एजन्सी आधीच नीट पेपरफुटीच्या वादामुळे अडचणीत सापडली आहे. त्यातच आता नीटचा निकाल जाहीर झाल्यानंतरही एनटीएच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. ओएमआर शीट आणि निकालातील त्रुटींमुळे एनटीएच्या एकूणच कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हे ताजे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर समोर आले आहे. एका विद्यार्थ्याने एनटीएच्या मूल्यमापन प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे.
दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेनुसार, विद्यार्थ्याचे नीटचे गुण २४ तासांत तब्बल ३ वेळा बदलण्यात आले. तसेच एनटीएच्या पोर्टलवर दाखवण्यात आलेली उत्तरपत्रिका ही ती नाही, जी विद्यार्थ्याने परीक्षेच्या दिवशी भरली होती, असा दावाही करण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊया नीट ओएमआर शीट आणि निकालातील या त्रुटींशी संबंधित संपूर्ण प्रकरण….
नीट यूजी २०२६ च्या पुनर्रपरीक्षेत बसलेल्या एका विद्यार्थ्याचा दावा आहे की, NTA च्या अधिकृत निकाल पोर्टलवर २४ तासांच्या आत ३ वेळा त्याचे गुण बदलले गेले. पहिल्यांदा जेव्हा त्याने नीट पुनर्रपरीक्षेचा निकाल पाहिला, तेव्हा त्याचा स्कोर ६५० होता. त्यानंतर काही वेळाने तो कमी होऊन ५०० झाला. तर दुसऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा निकाल पाहिला, तेव्हा मूळ ६५० असलेले गुण थेट १३५ वर आले. विद्यार्थ्याचा असाही दावा आहे की, पोर्टलवर जी उत्तरपत्रिका दिसतेय ती परीक्षेच्या दिवशी सादर केलेल्या उत्तरपत्रिकेपेक्षा वेगळी आहे. अॅडव्होकेट विनीत जिंदल यांच्यामार्फत या विद्यार्थ्याने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
विद्यार्थ्याने दाखल केलेल्या याचिकेत NTA ला त्याची मूळ भौतिक OMR उत्तरपत्रिका आणि परीक्षेशी संबंधित इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड सादर करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेचा मुख्य उद्देश मूल्यमापन प्रक्रियेची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी व्हावी हा आहे.
याचिकेशी संबंधित माहितीनुसार, विद्यार्थ्याच्या विरोधानंतरही एनटीए अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या रेकॉर्डमध्ये हीच OMR शीट आणि कागदपत्रे उपलब्ध आहेत, जी कोर्टासमोर सादर केली जातील. त्यानंतर विद्यार्थ्याला ईमेल केलेली ओएमआर शीट अजूनही शंकास्पद दिसत आहे.
गंभीर बाब म्हणजे, हा घोळ केवळ ओएमआर किंवा गुणांपुरता मर्यादित नाही, तर ओएमआर शीटवर परीक्षेची तारीख २१ जून २०२६ ऐवजी २१ जुलै २०२६ अशी दिसत आहे, तर प्रत्यक्षात NEET UG री-एग्झाम २१ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती.
विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, १६ जुलै २०२६ रोजी नीट यूजी पुनर्रपरीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. जेव्हा त्याने एनटीएच्या अधिकृत पोर्टलवर लॉगिन करून निकाल पाहिला, तेव्हा त्याला ६५० गुण दिसले. लॉगआउट करून पुन्हा लॉगिन केले असता ५०० गुण दिसले आणि पुढील दिवशी पुन्हा तपासले असता ते गुण थेट १३५ वर आले. यासंदर्भात विद्यार्थ्याने प्रथम NTA कडे तक्रार केली होती. आता हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचले असून, यावर ३१ जुलै, शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.






