सर्वेक्षणाच्या नादात शिक्षकच झाले शाळाबाह्य! शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षणही करावे लागणार; मनस्ताप कायम
भंडारा जिह्ल्यातील स्थानिक स्वराज्य संख्या तसेच खासगी शाळांमधील शिक्षकांना सतत विविध प्रकारच्या शाळाबाह्य आणि अशैक्षणिक कामात गुंतवून ठेवल्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच आता शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षकांच्या मुख्य प्रवाहात आणण्याची अतिरिक्त जबाबदारीही शिक्षकांवर सोपवण्यात आली आहे. आधीच अनेक नको असलेल्या कामांचा ताण झेलणारे शिक्षक आता शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधात स्वतःच शाळाबाह्य झाल्याचे विदारक चित्र संपूर्ण जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य – istock)
शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी दरवर्षी जुलै महिन्यात सर्वेक्षण केले जाते. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात हे सर्वेक्षण १५ ते ३० जुलै या कालावधीत पूर्ण करण्याचे सक्तीचे आदेश आहेत. आधीच २९ जून ते ३० जुलै या कालावधीत एसआयआरचे काम पूर्ण करण्याचे टार्गेट होते. मात्र आता या कामाची मुदत ८ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. एकीकडे एसआयआरच्या कामाचा प्रचंड तणाव असतानाच, प्रशासनाने १५ ते ३० जुलै दरम्यान पुन्हा शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी शिक्षकांच्या माथी मारली आहे. प्रशासनाच्या या मनमानी धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होत असल्याने पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
एकीकडे शाळा प्रवेशपात्र, स्थलांतरित तसेच शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना शाळेत दाखल करण्याचे आव्हान असतानाच, दुसरीकडे आधार कार्डच्या तांत्रिक अडचणींनी शिक्षकांचे जगणे मुश्कील केले आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे अद्ययावत आधार कार्ड नाही, अशा विद्यार्थ्यांना ‘यू डायस प्लस’ प्रणालीतून बाहेर काढले जाते. प्रत्यक्ष पटसंख्येवर विद्यार्थी असूनही केवळ आधार कार्ड अद्ययावत नसल्यामुळे ते ऑनलाईन पटसंख्येत दिसत नाहीत. परिणामी, शाळांची पटसंख्या कमी दाखवली जाऊन शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड शिक्षकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असून शिक्षकीय वर्तुळातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या जिल्ह्यातील शिक्षकांना बीएलओ आणि एसआयआरच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे सक्तीचे आदेश आहेत. या सगळ्यामुळे शिक्षकांची पुरती दमछाक उडाली आहे. एसआयआरचे काम अतिशय क्लिष्ट असून ते पूर्णपणे प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन करावे लागते. घरोघरी फिरताना लोकांचेही पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्याची ओरड शिक्षक करत आहेत. शिक्षकांकडून अध्यापनाचे काम सोडून इतर सर्वच कामे करून घेतली जात असल्याने गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.






