फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Padma Shri Awards: देशात दरवर्षी अनेक लोक आपल्या उल्लेखनीय कर्तुत्वाने आणि कौशल्याने अशी ओळख निर्माण करतात, जी समाजासाठी प्रेरणादायी ठरते. अशा व्यक्तींचा गौरव करण्यासाठी ‘पद्म पुरस्कार’ दिला जातो. यामध्ये ‘पद्मश्री’ हा देशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. नुकत्याच पार पडलेल्या पद्म पुरस्कार सोहळ्यात अनेक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्त्वांना सन्मानित करण्यात आले आहे.
पद्मश्री हा भारत सरकारचा अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा सन्मान आहे. या पुरस्काराची सुरुवात वर्ष १९५४ मध्ये झाली होती. कला, साहित्य, शिक्षण, विज्ञान, क्रीडा, वैद्यकीय, समाजसेवा किंवा इतर क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान दिला जातो.
आपल्या कार्याने समाज आणि देशाला नवी दिशा देणाऱ्या व्यक्तींना ओळख मिळवून देणे, हा या पुरस्काराचा उद्देश आहे. अनेकदा प्रसिद्धीच्या झोक्यात न येता वर्षांनुवर्षे आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे लोकही या सन्मानापर्यंत पोहोचतात.
विशेष म्हणजे या पुरस्कारासाठी थेट भरती प्रक्रिया किंवा कोणतीही परिक्षा नसते. यासाठी व्यक्तीचे काम आणि त्याचे योगदान या आधारावरच त्याची निवड केली जाते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोणताही भारतीय नागरिक या सन्मानासाठी नामांकित केला जाऊ शकतो.
पद्म पुरस्कारांसाठी सर्वसामान्य नागरिक कोणत्याही पात्र व्यक्तीच्या नावाची शिफारस करु शकतात. यानंतर गृह मंत्रालयाची (Ministry of Home Affairs) एक विशेष समिती सर्व नावांची सखोल पडताळणी करते. अंतिम मंजुरी राष्ट्रपतींकडून दिली जाते. त्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कार विजेत्यांच्या नवांची घोषणा केली जाते.
हा पुरस्कारात विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते एक पदक (मेडल) आणि सन्मानपत्र दिले जाते. परंतु, यासोबत कोणतीही रोख रक्कम दिली जात नाही. तरीही, या पुरस्काराची प्रतिष्ठा आणि मान अत्यंत मोठा आहे.






