फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Pm Modi On Work From Home: पंतप्रधान मोदी यांनी कार्यालये आणि व्यवसायांना शक्य तिथे वर्क फ्रॉम होम (घरी राहून काम करणे) करण्याचे आणि अनावश्यक प्रत्यक्ष बैठकांऐवजी ऑनलाईन परिषदा घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी नागरिकांना वाहनांचा अनावश्यक वापर कमी करण्याचे आणि बिगर-गरजेचे आंतरराष्ट्रीय प्रवास टाळण्याचेही आवाहन केले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या या आवाहनामुळे नागरिक आणि व्यवसायांना कोविड काळातील वर्क फ्रॉम होम आणि व्हर्च्युअल बैठकांचे दिवस पुन्हा आठवले आहेत. वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देण्यासोबतच, कंपन्या अधिकृत प्रवास कमी करणे, इंधनाचा वापर मर्यादित करणे आणि डिजिटल बैठकांना प्रोत्साहन देणे यावरही भर देत आहेत.
‘Shaadi.com’चे संस्थापक अनुपम मित्तल यांनी घोषणा केली आहे की, त्यांच्या कंपनीचे कर्मचारी आता दर आठवड्याला एक दिवस रिमोट वर्क (घरी राहून काम) करतील. हा निर्णय ‘X’ (ट्विटर) वर शेअर करताना मित्तल म्हणाले, “कधी विचार केला नव्हता, पण ५०० कर्मचाऱ्यांसाठी आता आठवड्यातून १ दिवस रिमोट वर्क असेल यामुळे वर्षाला ३० हजार लीटर पेट्रोलची बचत होणार आहे “
HDFC बँकेने बिझनेस इनेबलिंग आणि कॉर्पोरेट इनेबलिंग फंक्शन्स (बँकेच्या अंतर्गत प्रशासकीय कामे) मधील कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून दोन दिवसांपर्यंत वर्क फ्रॉम होमची घोषणा केली आहे.
येस बँकेतील काही टीम्स सध्या ‘हायब्रीड मोड’ (काही दिवस कार्यालय आणि काही दिवस घरून काम) वर काम करत असल्याचे वृत्त असून, बँक आता ग्राहकांशी थेट संबंध नसलेल्या कामांसाठीही हे हायब्रीड मॉडेल लागू करण्याचा विचार करत असून हे पाऊल पंतप्रधानांच्या वर्क फ्रॉम होम आणि व्हर्च्युअल बैठका घेण्याच्या आवाहनाला सुसंगत असल्याचे दिसून येते.
इंडसइंड बँकेने कॅशियर (tellers), शाखा व्यवस्थापक आणि ग्राहकांशी थेट संबंधित नसलेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी हायब्रीड वर्क पॉलिसी लागू केल्याचे वृत्त आहे. बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, हा विस्तार कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि संसाधनांची बचत करण्यासाठी लागू करण्यात आले आहे.
मारुती सुझुकीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जिथे शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होम अनिवार्य केले आहे. कंपनीच्या मते, खर्च कमी करण्यासाठी आणि इंधनाचा वापर मर्यादित करण्यासाठी प्रत्यक्ष भेटींऐवजी व्हर्च्युअल बैठकांना प्राधान्य देण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. कंपनीने ‘X’ वर पोस्ट करताना म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काटकसरीचे आवाहन, तसेच पश्चिम आशियातील युद्धाचे दीर्घकालीन परिणाम कमी करण्याची गरज लक्षात घेता मारुती सुझुकीने याला अत्यंत महत्त्व दिले आहे.”






